पूजाने यापूर्वीही केला होता आत्महत्येचा प्रयत्न
By admin | Published: September 9, 2015 02:13 AM2015-09-09T02:13:42+5:302015-09-09T02:13:42+5:30
येथील शासकीय मागासवर्गीय वसतिगृहातील १७ वर्षीय युवती पूजा विघ्ने हिचा शुक्रवारी अप्पर वर्धा धरणात मृतदेह आढळला होता.
कौटुंबिक कारण : शवविच्छेदन अहवालात पाण्यात बुडून मृत्यू
आष्टी (शहीद) : येथील शासकीय मागासवर्गीय वसतिगृहातील १७ वर्षीय युवती पूजा विघ्ने हिचा शुक्रवारी अप्पर वर्धा धरणात मृतदेह आढळला होता. यामुळे पूजाची हत्या की आत्महत्या, असा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर मंगळवारी शवविच्छेदन अहवाल आणि बयाणात पूजाने आत्महत्या केल्याचे उघड झाले.
पोलीस सूत्रानुसार, याप्रकरणी शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला असून पूजाचा बुडून मृत्यू झाल्याचे कारण नमूद आहे. ठाणेदाराने पूजाचा मामेभाऊ व मित्र-मैत्रीणींचे याप्रकरणी बयाण नोंदविले. यामध्ये पूजा कुटुंबातून होणाऱ्या मानसिक त्रासामुळे जगण्याची इच्छा नसल्याचे ती बोलत असल्याची बाब पुढे आली. तसेच एका वर्षाआधी पूजाने विष घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी तिची समजूत घालण्यात आली होती, असे तपासात उघड झाले. पूजा गुरुवारी सकाळी ७ वाजता वसतिगृहातून गेली ती परत आलीच नाही. त्यानंतर तिने अप्पर वर्धा धरणावर जावून पाण्यात जाऊन उडी मारून आत्महत्या केली. घटनेच्या वेळी धरणावर उपस्थित असलेल्या काही मासेमारांनी पूजा हिला उडी मारताना पाहिल्याचे नमुद आहे. त्यावेळी ती एकटी होती असे बयाणात मासेमारांनी सांगितले असल्याची माहिती ठाणेदार श्याम सोनटक्के यांनी दिली.(प्रतिनिधी)