गरिबांच्या हक्काचे रॉकेल चालले आॅटोरिक्षांमध्ये
By admin | Published: September 9, 2016 02:23 AM2016-09-09T02:23:15+5:302016-09-09T02:23:15+5:30
शहरातील काही आॅटोचालक पैसे वाचविण्यासाठी आॅटोमध्ये पेट्रोलसोबतच रॉकेल भरत असल्याने प्रदूषणात वाढ झाली आहे.
ग्राहकांवर अन्याय : रॉकेलच्या काळ्या धुरामुळे प्रदूषणातही वाढ
वर्धा : शहरातील काही आॅटोचालक पैसे वाचविण्यासाठी आॅटोमध्ये पेट्रोलसोबतच रॉकेल भरत असल्याने प्रदूषणात वाढ झाली आहे. त्यातच वापरले जात असलेले हे रॉकेल गरिबांच्या हक्काचे आहे. पोलीस व जिल्हा प्रशासनही याकडे साफ डोळेझाक करीत असल्याने हा प्रकार वाढतच चालला आहे.
शहरातील वातावरण स्वच्छ आणि निरोगी राहावे, यासाठी पालिका प्रशासनाच्या वतीने प्रयत्न केले जात असताना दुसरीकडे मात्र काही आॅटोरिक्षाचालक प्रदूषण करीत शहराची वाट लावत आहेत. रस्त्यावरून रिक्षा सतत धूर सोडत जातात. त्यामुळे मागून येणाऱ्या वाहनाचालकांना श्वासोच्छवासाचा त्रास सहन करावा लागतो. आता तर विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या आॅटोरिक्षांचे चालकही इंधनात रॉकेलचा वापर कराताना दिसत आहेत. ‘मॉर्निंग वॉक किंवा इव्हिनिंग वॉक’साठी बाहेर पडणाऱ्यांसोबतच सर्वांचेच आरोग्य या प्रदूषणामुळे धोक्यात आले आहे.
एकीकडे गरिबांना स्टोव्ह पेटविण्यासाठी रेशनवर रॉकेल मिळत नाही. आॅटोरिक्षाचालकांना मात्र इंधनात भेसळ करण्यासाठी रॉकेल सहज उपलब्ध होते. रेशनवर विकले जाणारे रॉकेल सर्वसामान्यांना दिले जात नसून, रिक्षावाल्यांना ब्लॅकने दुपटीच्या दराने विकले जात असल्याचा आरोप रेशन कार्डधारक करीत असतात. शहरात प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आहे. याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी होत आहे.