पॉझिटिव्हीटी रेट ‘हाय’; जिल्ह्याची पहिल्या पाचमध्ये नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 05:00 AM2021-02-27T05:00:00+5:302021-02-27T05:00:08+5:30
कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी केलेल्या या संचारबंदीच्या काळात शहरी व ग्रामीण भागातील बाजारपेठेतील वैद्यकीय सेवा वगळता सर्व दुकाने, मॉल्स, कॉम्पलेक्स, व्यायामशाळा, बाजार समिती, हॉटेल्स, उद्याने बंद राहतील. जीवनावश्यक सेवेत समाविष्ट असलेली दूध सेवा संचारबंदीच्या काळात सकाळी ६ ते सकाळी १० वाजता या कालावधीत सुरु राहतील. सर्व प्रकारच्या ट्रॅव्हल्स, खासगी बसेस, एसटी बसेस यासह खासगी वाहतूक (जीवनावश्यक वस्तुंची वाहतूक वगळता) पूर्णत: बंद राहतील.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : नागरिकांकडून कोरोना उपाययोजनांचे पालन केले जात नसल्याने जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्ही रेट चांगलाच वाढला आहे. पहिल्या लाटीमध्ये सर्वात शेवटी असलेला जिल्हा आता या दुसऱ्या लाटीत राज्यातील पहिल्या पाच जिल्ह्यामध्ये आला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने कडक उपाययोजना केल्या असून पुन्हा ३६ तासांची संचारबंदी लागू केली आहे. शनिवारी रात्री ८ वाजेपासून सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत ही संचारबंदी लागू राहणार आहे.
कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी केलेल्या या संचारबंदीच्या काळात शहरी व ग्रामीण भागातील बाजारपेठेतील वैद्यकीय सेवा वगळता सर्व दुकाने, मॉल्स, कॉम्पलेक्स, व्यायामशाळा, बाजार समिती, हॉटेल्स, उद्याने बंद राहतील. जीवनावश्यक सेवेत समाविष्ट असलेली दूध सेवा संचारबंदीच्या काळात सकाळी ६ ते सकाळी १० वाजता या कालावधीत सुरु राहतील. सर्व प्रकारच्या ट्रॅव्हल्स, खासगी बसेस, एसटी बसेस यासह खासगी वाहतूक (जीवनावश्यक वस्तुंची वाहतूक वगळता) पूर्णत: बंद राहतील. तर दूध डेअरी व विक्रीसेवा सकाळी ६ ते सकाळी १० आणि सायंकाळी ६ ते रात्री १० वाजतापर्यंत सुरु राहतील. औषधी दुकाने, रुग्णालये, वैद्यकीय प्रयोगशाळा, रुग्णवाहिका, एमआयडीअंतर्गत येणाºया सर्व आस्थापना मजुरांसह सुरु राहतील. अत्यावश्यक सेवेंतर्गत महावितरणची वीज सेवा, जीवन प्राधिकरणची पाणीपुरवठा सेवा, गॅस सेवा, रोड दुरुस्ती व नाले सफाईही सुरु राहणार आहे. विनाकारण चारचाकी व दुचाकीने वाहतूक करतांना आढळून आल्यास त्यांच्यावर दंडात्मक व फौजदारी कारवाई केली जाणार आहे, असे आदेशात नमूद केले आहे.
घाबरु नका, प्रशासनाला सहकार्य करा
जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या जात आहे. चाचणीची संख्या दुप्पट करण्यात आली असून फिरते निगराणी पथक कार्यरत आहे. लोकप्रतिनिधींकरिताही ग्रामीण आणि शहरी भागात सोमवार, मंगळवारी कार्यशाळेचे आयोजन केले जाईल. जे हॉटस्पॉट आहेत त्या ठिकाणी रुग्ण वाढत असल्यास आणखी निर्बंध घातले जाईल. सर्वांनी माझे कुटुंब, माझी जबाबदारी यामध्ये सहभागी होऊन प्रशासनाला सहकार्य करावे.
- प्रेरणा देशभ्रतार, जिल्हाधिकारी.
निगराणी पथक अॅक्टिव्ह करावे
सेवाग्राम आणि सावंगी रुग्णालय प्रशासनाशी चर्चा केल्यानंतर रुग्ण आठ ते दहा दिवस आजार अंगावर काढतात. त्यानंतर शेवटच्या क्षणी रुग्णालयात दाखल होतात, असे लक्षात आले. त्यामुळे कोरोनाने मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. म्हणून लक्षणे दिसताच तात्काळ चाचणी करुन घ्यावी. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता सुरुवातीप्रमाणेच गावात ग्राम निगराणी पथक करावे. ग्रामीण भागातील सरपंच, सदस्य आणि शहरीभागातील नगरसेवक यांनी याकरिता पुढाकार घ्यावा.
- डॉ.सचिन ओम्बासे, मुख्य कार्यकारी अधिकारी.
पॉझिटिव्ह रुग्णांनी योग्य माहिती द्यावी
कोरोनाची रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने पॉझिटिव्ह रुग्णांनी संपर्कात आलेल्या प्रत्येकाची योग्य माहिती द्यावी. जेणे करुन कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करुन त्यांची तपासणी करता येईल. त्यामुळे कोरोनाचा प्रसार रोखता येईल. पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांनी तात्काळ तपासणी करुन घ्यावी. तसेच प्रशासनाने सांगितलेल्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.
- डॉ. अजय डवले, जिल्हा आरोग्य अधिकारी.