फेरोमोन ट्रॅपच्या तुटवड्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 10:33 PM2018-08-03T22:33:53+5:302018-08-03T22:34:16+5:30

गत वर्षी कपाशी पिकावर गुलाबी बोंडअळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला होता. असे असले तरी यंदाच्या वर्षी जिल्ह्यातील २ लाख २९ हजार ५ हेक्टरवर कपाशीची लागवड झाली आहे. बोंडअळीला अटकाव करण्यासाठी एक एकरात कमीत कमी तीन कामगंध सापळे लावणे क्रमप्राप्त आहे.

Possible possibility of pheromone traps | फेरोमोन ट्रॅपच्या तुटवड्याची शक्यता

फेरोमोन ट्रॅपच्या तुटवड्याची शक्यता

googlenewsNext
ठळक मुद्दे२.२९ लाख हेक्टरवरील कपाशीसाठी १७.१७ लाख कामगंध सापळ्यांची गरज

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : गत वर्षी कपाशी पिकावर गुलाबी बोंडअळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला होता. असे असले तरी यंदाच्या वर्षी जिल्ह्यातील २ लाख २९ हजार ५ हेक्टरवर कपाशीची लागवड झाली आहे. बोंडअळीला अटकाव करण्यासाठी एक एकरात कमीत कमी तीन कामगंध सापळे लावणे क्रमप्राप्त आहे. २.२९ लाख हेक्टर वरील कपाशी पिकाच्या संरक्षणासाठी सुमारे १७ लाख १७ हजार ५३७ कामगंध सापळ्यांची गरज भासणार आहे. कृषी विभागाने आतापर्यंत २३ हजार कामगंध सापळे वाटप केले असले तरी भविष्यात कामगंध सापळ्यांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तविला जात आहे.
गुलाबी बोंडअळी या पतंगवर्गीय किटकाची मादी एक विशिष्ट प्रकारचा गंध वातावरणात सोडते. त्यामुळे नर किटक मादीकडे आकर्षीत होतात. या यंत्रणेचा वापर करून बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी व शेतामधील बोंडअळीचा नर पतंग पकडण्यासाठी कामगंध सापळा फायद्याचा ठरतो. नर पतंग पकडल्या गेल्यास पुढील प्रजनन रोखण्यास मदत होते. बोंडअळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी व प्रादुर्भाव तात्काळ लक्षात घेण्यासाठी कामगंध सापळ्यांचा वापर प्रभावी व फायद्याचा ठरतो. या सापळ्यांचा वापर कपाशी लागवडीपासून ४५ दिवसांनी केल्यास किडीची संख्या लक्षात येते आणि किटकनाशकांचा योग्य वेळी तसेच योग्य प्रमाणात वापर करून ही किड नियंत्रणात येऊ शकते. यंदाच्या वर्षी गुलाबी बोंडअळीला अटकाव करण्यासाठी जिल्हा प्रशासनासह जिल्ह्याच्या कृषी विभागाने कंबर कसली आहे. असे असले तरी कृषी विभागाच्यावतीने आतापर्यंत केवळ २३ हजारच कामगंध सापळे वाटप करण्यात आल्याने यंदाही बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येणार असल्याचे बोलले जात आहे. शिवाय भविष्यात कामगंध सापळ्यांचा तुटवडा जिल्ह्यात निर्माण होणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
ट्रॅप वाटपाची जुळवाजुळव नाहीच
यंदाच्या वर्षी बोंडअळीला जिल्ह्यात अटकाव करण्यासाठी काय करता येईल या अनुषंगाने जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या अध्यक्षतेत कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रतिनिध, जिनिंग प्रेसिंगचे प्रतिनिधी, कृषी विभागाचे अधिकारी आदींच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समितींना १४ हजार तर जिल्ह्यातील ५२ जिनिंग प्रेसिंग मिलला ५२ हजार कामगंध सापळे वाटप करण्याच्या सूचना दिल्या होत्या. सदर संस्थांकडून सध्या कामगंध सापळे वाटप केले जात असले तरी आतापर्यंत किती कामगंध सापळे वाटप करण्यात आले याची माहितीच कृषी विभागाकडे उपलब्ध नाही. शिवाय बाजारपेठेत किती कामगंध सापळे विक्रीकरिता उपलब्ध आहेत याचीही माहिती कृषी विभागाने घेतली नसल्याचे सांगण्यात येते.
तीन जिल्ह्यातील जिनिंगमध्ये आढळला होता पतंग
यंदाच्या जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वर्धा जिल्ह्यासह यवतमाळ व अमरावती जिल्ह्यातील जिनिंग प्रेसिंग मिलमध्ये लावण्यात आलेल्या कामगंध सापळ्यांमध्ये गुलाबी बोंडअळीचे पतंग आढळले होते. या किडींच्या अवस्था जरी अळी, कोश आणि पतंग कापसाच्या मिलमध्ये आढळून येतात. यामुळे ही किड नियंत्रणात ठेवणे आश्यक असून जिनिंग परिसरात किमान पाच कामगंध सापळे लावणे क्रमप्राप्त असल्याचे सांगण्यात आले.
अन्यथा जिनिंग व्यावसायिकांना द्यावी लागेल कपाशी उत्पादकांना नुकसान भरपाई
जिल्ह्यातील ५२ जिनिंग व्यावसायिकांना प्रत्येकी एक हजार कामगंध सापळे त्यांच्या परिसरातील कपाशी उत्पादक शेतकऱ्यांना वाटपाचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. ज्या जिनिंगच्या दोन किमीच्या परिसरात बोंडअळीचा प्रादुर्भाव व नुकसान झाल्याचे दिसेल त्या जिनिंग मालकाला सदर कपाशी उत्पादक शेतकºयाला नुकसान भरपाई देण्याच्या कार्यवाहीला सामोरे जावे लागणार आहे. तसेच लेखी सूचना पत्रही कृषी विभागाने सर्व जिनिंग मालकांना बजावले असल्याचे सांगण्यात आले.
८ गावांवर कृषी विभागाची करडी नजर
बोंडअळीच्या प्रादुर्भावाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी यंदाच्या वर्षी क्रॉपसॅप प्रकल्प अंतर्गत जिल्ह्यातील वर्धा तालुक्यातील पवनूर, सेलू तालुक्यातील धानोरी(मेघे), देवळी तालुक्यातील विजयगोपाल, आर्वी तालुक्यातील मदना, आष्टी तालुक्यातील धाडी, कारंजा तालुक्यातील गवंडी, हिंगणघाट तालुक्यातील पिंपळगाव व समुद्रपूर तालुक्यातील ताडेगावची निवड करण्यात आली आहे. या गावांमधील एकूण ८ हजार हेक्टरवरील कपाशी पिकांवरील बोंडअळीचा प्रादुर्भाव कसा टाळता येईल यासाठी सध्या कृषी विभाग प्रयत्न करीत आहे. बोंडअळीला अटकाव करण्यासाठी तेथील शेतकºयांना आतापर्यंत २३ हजार कामगंध सापळे वाटप करण्यात आले आहेत.

शासनाच्या निर्देशानुसार आम्ही आतापर्यंत २३ हजार कामगंध सापळे शेतकºयांना वाटप केले आहेत. शिवाय त्यांना योग्य मार्गदर्शन करीत आहोत. जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समिती व जिनिंगने किती कामगंध सापळे वाटप केले याची आकडेवारी सध्या गोळा केली जात आहे. ही आकडेवारी प्राप्त होताच नेमके किती कामगंध सापळे वाटप झाले याची इत्तमभूत माहिती प्राप्त होणार आहे. सध्या कामगंध सापळ्यांचा तुटवला नसला तरी तो भविष्यात तो निर्माण होऊ नये याची दक्षता घेतली जात आहे.
- डॉ. विद्या मानकर, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी, वर्धा.

Web Title: Possible possibility of pheromone traps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.