डाकघरातून पळविलेली रक्कम ठेवीदारांची
By admin | Published: February 7, 2017 01:13 AM2017-02-07T01:13:33+5:302017-02-07T01:13:33+5:30
सेवाग्रात येथील ऐतिहासिक डाक कार्यालयात चोरट्यांनी गॅस कटरने तिजोरी कापून सुमारे १ लाख १९ हजार रुपयांची रक्कम लंपास केली.
सुगावा नाही : तपासाकरिता दोन चमू तयार
वर्धा : सेवाग्रात येथील ऐतिहासिक डाक कार्यालयात चोरट्यांनी गॅस कटरने तिजोरी कापून सुमारे १ लाख १९ हजार रुपयांची रक्कम लंपास केली. ही रक्कम डाक कार्यालयातील दैनंदिन व्यवहाराची नसून ती ठेवीदारांचीच होती, अशी माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. मात्र, चोरट्यांपर्यंत पोहोचण्याचा कुठलाही सुगावा मिळविण्यात पोलिसांना अद्याप यश आले नाही.
चोरी झाली ते डाकघर बापूकुटीपासून काही अंतरावर आहे. या डाकघरात सीसीटीव्ही कॅमेरा नाही; पण काही अंतरावर असलेल्या बापूकुटीच्या प्रवेशद्वारावर सीसीटीव्ही आहे. या कॅमेऱ्यात चोरट्यांच्या हालचाली कैद झाल्या असाव्या असा अंदाज पोलिसांना असल्याने त्यांनी या कॅमेऱ्याचे फुटेज तपासण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यातही काहीच मिळून आले नाही. गॅस कटरचा वापर करून तिजोरी कापणारी टोळी जिल्ह्यातील की इतर भागातील याचा अंदाज बांधने कठीण असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या चोरीच्या तपासासाठी दोन चमू तयार करण्यात आले असून त्यांच्याकडून आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सध्या हाती काहीच आले नसून या टोळीने एकच चोरी केली नसावी. अशा आणखी चोऱ्या केल्या असाव्या असा संशय ठाणेदार पिदुरकर यांनी व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)