कुक्कुटपालन केंद्र जळून खाक
By admin | Published: May 21, 2017 01:02 AM2017-05-21T01:02:02+5:302017-05-21T01:02:02+5:30
जाम जवळील शैलेश पटेल पोल्ट्री फार्म परिसरात आग लागली. यात पोल्ट्री फार्मचा परिसर जळून खाक झाला.
वृद्धाश्रम व अनाथालय बचावले : हवेच्या दिशेमुळे अनर्थ टळला
लोकमत न्यूज नेटवर्क
समुद्रपूर : जाम जवळील शैलेश पटेल पोल्ट्री फार्म परिसरात आग लागली. यात पोल्ट्री फार्मचा परिसर जळून खाक झाला. घटनेच्या वेळी वाऱ्याची दिशा गावाच्या विरूद्ध दिशेने असल्याने मोठा अनर्थ टळला. यामुळे लागूनच असलेले ख्रिश्चन मिशनरीचे वृद्धाश्रम व अनाथालय थोडक्यात बचावले. आगीवर ताबा मिळविण्याकरिता हिंगणघाट येथील अग्निशमन दल उशीरा पोहोचल्याने आगीने रौद्र रूप धारण केले होते. ही घटना शनिवारी दुपारी घडली.
जाम लगत शैलेश पटेल यांच्या मालकीचा पोल्ट्री फार्म आहे. येथे नामदेव कारवटकर काम पाहतात. दुपारी २ वाजताच्या दरम्यान पोल्ट्री फार्मच्या मागच्या बाजूने कचऱ्याने पेट घेतला. पाहता-पाहता या आगीने पोल्ट्री फार्मचा ३०-४० एकराचा परिसर कवेत घेतला. घटनेची माहिती मिळताच समुद्रपूर पोलिसांनी हिंगणघाटच्या अग्निशामक दलाला पाचारण केले. सदर दल दोन तास उशीर आल्याने आगीने रौद्र रूप धारण केले. अग्निशामक दल उशीरा आल्याने जामच्या नागरिकांनी संताप व्यक्त केला होता. पोल्ट्री फार्मवर कोंबड्या नव्हत्या; मात्र कोंबड्यांचे खाद्य व इतर साहित्य असे सुमारे २ लाख रुपयांचे नुकसान झाले. घटनास्थळी ठाणेदार प्रवीण मुडे, पोलीस उपनिरीक्षक उमेश हरनखेडे, राजू ठाकरे, उपसरपंच सचिन गावंडे, तलाठी राऊत, ग्रामविकास अधिकारी पोहाणे, पोलीस पाटील कवडू सोमलकर, टेकाडे, महेश पटेल, राजू खेडेकर उपस्थित होते.