विजेचा खेळखंडोबा, उपकरणांत बिघाड
By admin | Published: May 9, 2016 02:13 AM2016-05-09T02:13:12+5:302016-05-09T02:13:12+5:30
वादळ, वारा आणि पाऊस म्हटला की सर्वात आधी प्रभाव पडतो तो वीज पुरवठ्यावर! गत चार दिवसांपासून याचा अनुभव नागरिक घेत आहेत.
वारा आला की होतो वीज पुरवठा खंडित : चार दिवसांपासून शहरांसह गावांतही लपंडाव
वर्धा : वादळ, वारा आणि पाऊस म्हटला की सर्वात आधी प्रभाव पडतो तो वीज पुरवठ्यावर! गत चार दिवसांपासून याचा अनुभव नागरिक घेत आहेत. संपूर्ण जिल्ह्यात वादळी वारा व पावसाने चार दिवस थैमान घातले. यात वर्धा शहरासह ग्रामीण भागाला वीज पुरवठ्याचा सर्वाधिक फटका बसला. शहरातील काही भागात रात्रभर व दुसऱ्या दिवशीही तर ग्रामीण भागात एक-दोन दिवस वीज पुरवठा सुरळीत झालेला नव्हता.
शहरालगतच्या उमरी (मेघे) येथील वॉर्ड क्रमांक ३, सिंदी (मेघे) वॉर्ड नं. ५ आणि झाडे डीपी परिसरात विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. या भागात झाडे डीपी येथून वीज पुरवठा होतो. रोहित्रातून वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. कमी-अधिक वीज दाबामुळे नागरिक हैराण झाले आहे. यातच वादळ वारा असला की यात आणखी भर पडते. गतवर्षी फ्रीज, टीव्ही, कुलर, फॅन जळाले होते. त्याची शुक्रवारी पुनरावृत्ती झाली. रात्री अधिक दाब निर्माण होऊन सर्वांच्या घरातील उपकरणे जळाली. रोहित्र बसविताना सदोष काँक्रीटचा चबुतरा बनविला. उमरी (मेघे) वॉर्ड ३ येथे सिंगल फेज लाईन आहे. ती थ्री-फेज करावी. विजेचा खेळखंडोबा दूर करून वीज पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांनी महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना निवेदनातून केली आहे.(कार्यालय प्रतिनिधी)
मुदत संपल्यानंतर दिली विजेची देयके
रोहणा : परिसरात विद्युत वितरण कंपनीने मनमानी कारभार चालविला आहे. अवास्तव रकमेची देयके तर दिली जातातच; पण आता मुदत संपल्यानंतर देयके वितरित करण्यात आली आहे. यामुळे ग्रामस्थांना १० ते ५० रुपयांपर्यंतचा भुर्दंड सोसावा लागत आहे. अधीक्षक अभियंत्यांनी याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.
विद्युत वितरण कंपनी आता घरगुती वीज वापराचे देयक प्रत्येक महिन्यात वितरीत करते. ही देयके वितरित केल्यानंतर ग्राहकांना किमान सात दिवसांचा कालावधी मिळणे आवश्यक आहे, असे कंपनीच्या नियमावलीत स्पष्ट नमूद आहे. त्यानुसार कंपनीने ग्राहकांना विद्युत देयके सात दिवसांपूर्वी वितरित करणे गरजेचे आहे; पण परिसरात गत कित्येक महिन्यांपासून ऐन वेळेवर बिल दिले जात आहे. यामुळे अल्पावधीत बिल भरण्याची तरतूद करताना ग्राहकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अनेकांना मुदत संपल्यावर दंडासह देयक अदा करावे लागत आहे. यावेळी मात्र वीज कंपनीने कहरच केला. बिल भरण्याची अंतिम मुदत २७ एप्रिल होती, ती देयकेच ५ मे नंतर वितरित करण्यात आली. अनेक ग्राहकांना ती ६ मे रोजी मिळाली. काहींना अद्यापही देयकेच मिळाली नाही. प्राप्त बिलावर अंतिम मुदत २७ एप्रिल असून ९ मे पर्यंत देयक भरल्यास १० ते ५० रुपयांपर्यंत दंडाचा भुर्दंड ग्राहकांवर लादला आहे. ९ मे पर्यंत देयक न भरल्यास पुन्हा दंडाची आकारणी केली आहे. विद्युत वितरण कंपनीच्या या महमद तुघलकी कारभारामुळे परिसरातील ग्राहक त्रस्त झाले आहेत. दंडासह बिल अदा न केल्यास वीज पुरवठा खंडित केला जातो. यात ग्राहकांना पुन्हा जोडणीसाठी १०० रुपयांचा दंड भरावा लागतो. हा प्रकार दुष्काळाच्या छायेत जगणाऱ्या ग्राहकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा असल्याचेच दिसून येत आहे.
बिल वितरणाचे काम खासगी असल्याने कंत्राटदाराची माणसे त्यात हयगत करतात. त्यांच्यावर महावितरणच्या अधिकाऱ्यांचे नियंत्रण नसल्याचे सांगण्यात येते; पण ही बाब विद्युत नियामक मंडळाच्या नियमावलीचे उलंघन करणारी आहे. यात फेरबदल करून ग्राहकांना नियमावलीतील तरतुदीनुसार सात दिवसांपूर्वी देयके वितरित करावी, तरच दंड वसुलीसाठी कंपनी पात्र असेल, अन्यथा दंड आकारणी बंद करावी, अशी मागणी ग्राहकांनी केली आहे.(वार्ताहर)