वीज खांब झुकले, तारा तुटलेल्याच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 12:06 AM2018-06-18T00:06:45+5:302018-06-18T00:06:45+5:30
शेतकऱ्यांना अस्मानी व सुलतानी संकटांचा नेहमीच सामना करावा लागतो. याचाच प्रत्यय सध्या तालुक्यातील सोनेगाव (बाई) येथील शेतकऱ्यांना येत आहे. पावसाने दहा दिवसांपासून दडी मारल्याने शेतकरी सिंचन करून पिके वाचवू शकले असते; पण वादळी पावसात वाकलेले खांब व तुटलेल्या तारांची अद्याप दुरूस्ती करण्यात आली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : शेतकऱ्यांना अस्मानी व सुलतानी संकटांचा नेहमीच सामना करावा लागतो. याचाच प्रत्यय सध्या तालुक्यातील सोनेगाव (बाई) येथील शेतकऱ्यांना येत आहे. पावसाने दहा दिवसांपासून दडी मारल्याने शेतकरी सिंचन करून पिके वाचवू शकले असते; पण वादळी पावसात वाकलेले खांब व तुटलेल्या तारांची अद्याप दुरूस्ती करण्यात आली नाही. यामुळे आठ दिवसांपासून सिंचन ठप्प आहे. परिणामी, जमिनीतील बिजांकूरही कोमेजले आहे.
यंदा मान्सूनच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. सतत पाच-सहा दिवस दमदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीला सुरूवात केली. विशेषत: ज्यांच्याकडे ओलिताची सोय आहे, त्याच शेतकऱ्यांनी पेरणी केली. सोनेगाव (बाई) येथील सिंचनाची सोय असलेल्या असंख्य शेतकºयांनी कपाशी व सोयाबीनची पेरणी केली. दहा दिवसांपासून पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकरी सिंचनाच्या तयारीत आहे; पण पहिल्या पावसात वादळाने वाकलेले वीज खांब व तुटलेल्या तारा महावितरणने अद्याप दुरूस्त केल्या नाहीत. यामुळे सिंचन व्यवस्था कोलमडली आहे. वारंवार महावितरण कार्यालयात सूचना व तक्रार करूनही दुरूस्ती करण्यात आली नाही. महावितरणच्यास या कोटगेपणामुळे सिंचन व्यवस्था असताना शेतकऱ्यांना लाखमोलाची पिके वाचविता येत नाही. डोळ्यादेखत बिजांकूर कोमेजताना पाहून शेतकऱ्यांचे काळीज धडधडत आहे.
आठ दिवसांपासून महावितरणने दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याने शेत शिवारात विद्युत खांब झुकलेले तथा ठिकठिकाणी तारा तुटल्याचे दिसून येत आहे. या तारा व वाकलेल्या खांबांमुळे शेतीची कामेही खोळंबली आहेत. कृषी पंप बंद असल्याने जनावरांच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे. महावितरणने याकडे लक्ष देत त्वरित लवकरात लवकर दुरूस्ती करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
दुरूस्तीचा दिवस उजाडेच ना
जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाचे दमदार हजेरी लावली. यातच वादळी वाऱ्यामुळे देवळी तालुक्यात मोठ्या प्रमाणात विद्युत खांब झुकले. शिवाय तारा तुटल्याने शेतशिवारांतील विद्युत प्रवाह खंडित झाला. सोनेगाव बाई येथील शेतांतील कृषी पंपांचा विद्युत पुरवठा आठ दिवसांपासून बंद आहे. अनेक ठिकाणी वीज खांब झुकले असून तारा तुटलेल्या आहेत. शेतांमध्ये खांब व तारा असल्याने शेतीची कामे करणेही कठीण झाले आहे. याबाबत तक्रारी करूनही दुरूस्ती होत नसल्याने असंतोष पसरला आहे. वायगांव येथील विद्युत कार्यालयात तक्रार करायला गेल्यावर उद्या दुरूस्ती करून देतो, असे सांगितले जाते; पण सहा दिवसांपासून कर्मचाऱ्यांचा दुरूस्तीचा दिवसच उजाडला नाही. यामुळे शेतकरी मात्र त्रस्त आहे.