वीज सवलत अनुदान बंद; उद्योग आले अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 05:00 AM2021-09-09T05:00:00+5:302021-09-09T05:00:07+5:30
राज्य शासनाने उद्योगांना विशेष सवलत जाहीर करुन जवळपास दोन रुपयापर्यंत प्रति युनिट अनुदान मिळत होते. विदर्भ व मराठवाडा येथे जास्तीत जास्त उद्योजकांनी येऊन उद्योग उभारावे यातून रोजगार निर्मिती व्हावी, या उद्देशाने ही वीज सवलत देण्यात आली होती. यासाठी २०२०-२१ मध्ये शासनाने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडे अंदाजे १२०० कोटी रुपयांचे अनुदान उपलब्ध करुन दिले होते; मात्र शासनाने २०२१-२२ करिता अनुदान उपलब्ध न केल्याने मे २०२१ पासून सवलत देणे बंद केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : विदर्भ व मराठवाड्यातील उद्योगांना राज्य शासनाने वीज देयकामध्ये विशेष सवलत जाहीर केली होती; मात्र ही वीज सवलत अनुदान मे महिन्यांपासून बंद झाल्याने विदर्भातील उद्योग अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे वीज सवलत अनुदान योजना तत्काळ सुरु करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी सचिव शेखर शेंडे व एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण हिवरे यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना निवेदनातून केली आहे.
राज्य शासनाने उद्योगांना विशेष सवलत जाहीर करुन जवळपास दोन रुपयापर्यंत प्रति युनिट अनुदान मिळत होते. विदर्भ व मराठवाडा येथे जास्तीत जास्त उद्योजकांनी येऊन उद्योग उभारावे यातून रोजगार निर्मिती व्हावी, या उद्देशाने ही वीज सवलत देण्यात आली होती.
यासाठी २०२०-२१ मध्ये शासनाने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडे अंदाजे १२०० कोटी रुपयांचे अनुदान उपलब्ध करुन दिले होते; मात्र शासनाने २०२१-२२ करिता अनुदान उपलब्ध न केल्याने मे २०२१ पासून सवलत देणे बंद केले आहे. कोरोना महामारीमुळे आधीच अनेक उद्योग आर्थिक संकटात सापडले आहे.त्यातच मिळणारे अनुदान उपलब्ध नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. राज्य शासनाने लवकरात लवकर वीज वितरण कंपनीला अनुदान उपलब्ध करुन दिल्यास वीज बिलात सवलत मिळेल, उद्योगाला याचा फायदा होऊन स्पर्धेत टिकता येईल. असे निवेदनातून सांगितले. आधीच कोरोनामुळे अनेक उद्योजकांवर आर्थिक संकट उभे असून नैराश्यात आले आहे. त्यामुळे याकडे लक्ष देण्याची नितांत गरज आहे.
चर्चेदरम्यान ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी याबाबत शासन स्तरावरुन लवकरात लवकर निधी उपलब्ध करुन देत विदर्भातील उद्योजकांना न्याय मिळवून देणार असे आश्वासन शेखर शेंडे व प्रवीण हिवरे यांना दिले.