विद्युत कर्मचाऱ्यांनी मोडले ऊर्जामंत्र्यांच्या नावाने बोट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 11:30 PM2019-01-07T23:30:23+5:302019-01-07T23:30:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : तीन दिवसीय संपात सहभागी महानिर्मिती, महापारेषण व महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी सोमवारी बोरगाव (मेघे) येथील वीज ...
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : तीन दिवसीय संपात सहभागी महानिर्मिती, महापारेषण व महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी सोमवारी बोरगाव (मेघे) येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर एकत्र येत कामगारविरोधी धोरणाचा निषेध नोंदविला. टाळ व ढोलकीच्या तालावर आंदोलनकर्त्यांनी ऊर्जा मंत्र्यांच्या नावाने बोटेही मोडली. इतकेच नव्हे तर एकापेक्षा एकसरस भजने सादर करून आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले.
महापारेषण कंपनीतील स्टाप सेटअप लागू करीत असताना एकूण मंजुर पदे कमी न करता अंमलात आणावे. महावितरण कंपनीतील प्रस्तावित पुनर्रचना संघटनांनी सुचविलेल्या सुचनांचा अंतर्भाव करूनच अंमलात आणावा. शासन व व्यवस्थापनाने महावितरण कंपनीने राबविण्यात येत असलेले खाजगीकरण करण्याचे धोरण थांबवावे. मुब्रा, कळवा आणि कालेगावचे विभाग फ्रेन्चाईसीवर खाजगी भांडवलदार कंपनीने देण्याची प्रक्रिया ताताडीने थांबविण्यात यावी. महानिर्मिती कंपनीच्या अधिकार क्षेत्रात कार्यरत असलेल्या लघु जल विद्युत निर्मिती संचाने शासनाने अधिग्रहण न करता महानिर्मिती कंपनीच्या अधिकार क्षेत्रात कार्यरत ठेवावे. महानिर्मिती कंपनीच्या २१० मे.व्हॅ.चे संच बंद करण्याचे धोरण थांबवावे.
महाराष्ट्र सरकारच्या मंत्रीमंडळ समितीने तिनही कंपन्यातील सर्व कर्मचाºयांकरिता मान्य केलेली जुनी पेंशन योजनेच्या धर्तीवरील पेंशन योजना लागू करण्यात यावी. तिनही कंपनीतील रिक्त पदे तातडीने भरण्यात यावी. शिवाय बदली धोरणाचा पुनर्रविचार संघटनेसोबत चर्चा करून करावा. त्यानंतर बदलीचे धोरण अंमलात आणावे. महावितरण, पारेषण व महानिर्मिती या कंपन्यांमधील कंत्राटी व आऊटसोर्सिंग कर्मचाºयांना टप्प्याटप्प्याने कायम कामगार म्हणून सामावून घ्यावे, या मागण्यांसाठी हे आंदोलन संयुक्त कृती समितीच्या नेतृत्त्वात करण्यात आले. आंदोलनात सुरेश गोसावी, मनोहर उईके, अरविंद डबुरकर, सचिन सोनस्कर, विवेक कोठारे, संदेश फुलपाटील, खुशाल झाडे, नरेश भारद्वाज, सुनील तडस, डी.एम. देशमुख, दिलीप तडस, मैथीली खटी, राधा बोपचे यांच्यासह महा.स्टेट इले. वर्कर्स, फेडरेशन, महा. वीज कामगार महासंघ (बी.एम.एस.), विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन, सवॉर्डिनेट इंजिनियर असोसिएशन, महाराष्ट्र राज्य वीज कामगार काँग्रेस (इंटक), महाराष्ट्र राज्य तांत्रिक कामगार संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
विविध कामे प्रभावित
या संपात जिल्ह्यातील सुमारे ९०० वीज अधिकारी व कर्मचारी सहभागी झाल्याने महावितरण, पारेषण आणि महानिर्मितीच्या कार्यालयातील विविध कामे खोळंबली होती. राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांवर तात्काळ सहानुभूतीपूर्वक विचार करून योग्य निर्णय न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.