पं.स. शिक्षण विभागाकडून दप्तर तपासणी मोहीम
By admin | Published: July 8, 2017 12:25 AM2017-07-08T00:25:59+5:302017-07-08T00:25:59+5:30
महाराष्ट्र शासनाच्यावतीने प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन किती असावे याचे निकष ठरविण्यात आले आहे.
१२ इंग्रजी माध्यमांच्या शाळेत जाऊन केली पाहणी
लोकमत न्यूज नेटवर्क
घोराड : महाराष्ट्र शासनाच्यावतीने प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन किती असावे याचे निकष ठरविण्यात आले आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने तालुक्यातील १२ इंग्रजी माध्यमांच्या शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांच्या दप्तरांचे वजन करण्यात आले. शुक्रवारला सेलू पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून सदर मोहीम राबविण्यात आली.
शासनाने ठरविलेल्या निकषाप्रमाणे विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन आहे किंवा नाही याची तपासणी मोहीम पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून राबविण्यात येत आहे. यात दप्तर तपासणी निकषानुसार जास्त वजन बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच शाळांना दप्तराचे वजन कमी करण्याच्या सुचना देण्यात आल्या. या तपासणी मोहिमेत सर्व विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, विषयतज्ञांचा सहभाग होता.
दप्तराचे ओझे तपासणीच्या विशेष मोहीम राबविण्यामागचा उद्देश शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक व पालक यांच्यात जागृती करणे, तसेच दप्तराच्या वजनामुळे होणारे दुष्परिणाम सांगणे, दप्तराचे वजन कमी करण्याकरिता उपाययोजना करुन गैरसमज दूर करण्याचा आहे, असे विस्तार अधिकारी सुशील बनसोड यांनी यावेळी सांगितले.
लहान वयात मुलांना पाठीवर दप्तराच्या रुपाने वजन उचलावे लागते. यामुळे त्यांच्या शारीरिक विकासावर विपरीत परिणाम होत असल्याने राज्य शासनाने सदर निर्णय घेतला आहे. या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी व्हावी म्हणून शासन प्रयत्नरत आहे. याबाबत संबंधीत विभागाला आदेश देण्यात आले आहे.