पं.स. सभापती पदासाठी खलबते सुरू; सदस्य वारीला
By admin | Published: March 12, 2017 12:40 AM2017-03-12T00:40:53+5:302017-03-12T00:40:53+5:30
स्थानिक पं.स. सभापतीची निवड १४ मार्च रोजी होणार आहे. येथे भाजपकडे ७, काँग्रेस ३, राष्ट्रवादी २,
हिंगणघाट/अल्लीपूर : स्थानिक पं.स. सभापतीची निवड १४ मार्च रोजी होणार आहे. येथे भाजपकडे ७, काँग्रेस ३, राष्ट्रवादी २, सेना १ व इतर १ असे संख्याबळ आहे. सभापती पदासाठी सध्या खलबतं सुरू असून सदस्य मात्र वारीला गेल्याचे कळते.
भाजपला बहुमतासाठी केवळ एका सदस्याची गरज आहे. भाजपाच्या गळाला कोण लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपकडे प्रशांत चंदनखेडे अल्लीपूर, विजय पर्बत फुकटा, गंगाधर कोल्हे पोहणा, वंदना मडावी पिपरी, वैशाली पुरके नांदगाव, छाया बोरकर वाघोली व धनंजय रिठे, आजंती हे सदस्य असून ते वारीवर गेले आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते एक सदस्य हेरण्याचा प्रयत्न करीत असून अद्याप कुणाशी बोलणी झाल्याची माहिती नाही; पण वेळेपर्यंत सर्वच मंगल होईल, अशी पक्षाला आशा आहे. भाजपचे सभापती पदाचे उमेदवार हे १ मताने पराभूत झाले. यामुळे पक्षाचे तसेच वैयक्तिक प्रफुल बाडे यांचे स्वप्न भंग झाल्याने ‘गड आला; पण सिंह गेला’, अशी स्थिती आहे. बाडे विजयी झाले असते तर सभापती पदाचे चित्र स्पष्ट असते. सध्या सभापती पदाची माळ आजनसरा येथील विजय पर्बत यांच्या गळ्यात पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे; पण ते वेळच ठरवेल. याबाबत भाजपचे तालुकाध्यक्ष आकाश पोहाणे यांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते निर्णय घेतील. अद्याप कुणासोबत चर्चा झाली नाही; पण वेळेपर्यंत एक सदस्य मिळेल, असे सांगितले.(तालुका प्रतिनिधी/वार्ताहर)