प्रहार अपंग संघटनेच्या उपोषणाची सांगता
By admin | Published: March 3, 2017 01:47 AM2017-03-03T01:47:24+5:302017-03-03T01:47:24+5:30
गत दोन दिवसांपासून सुरू असलेल्या प्रहार अपंग संघटनेच्या आंदोलनाची गुरुवारी सांगता झाली.
रामदास तडस यांची मध्यस्थी : तीन लाखांच्या धनादेशासहित इतर मागण्या मान्य
देवळी : गत दोन दिवसांपासून सुरू असलेल्या प्रहार अपंग संघटनेच्या आंदोलनाची गुरुवारी सांगता झाली. यावर खा. रामदास तडस यांच्या मध्यस्थीने तोडगा काढण्यात आला. संघटनेचे पदाधिकारी प्रमोद कुऱ्हाटकर व हनुमंत झोटींग यांना खा. तडस यांच्या हस्ते निंबू पाणी देऊन उपोषण सोडण्यात आले.
समाजातील अपंगाना न.प.च्या उत्पन्नातील तीन टक्क्याचा वाटा देण्याचे शासनाचे धोरण आहे. परंतु गत दोन वर्षांपासूनचा वाटा न मिळाल्याने संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. देवळी परिसरातील अपंगानी स्थानिक न.प. कार्यालयासमोर बैठा सत्ताग्रह केला. तसेच अपंग संघटनेचे विदर्भ अध्यक्ष झोटींग व जिल्हाध्यक्ष कुऱ्हाटकर यांनी आमरण उपोषण सुरू केले. नगराध्यक्ष सुचिता मडावी, उपाध्यक्ष प्रा. नरेंद्र मदनकर, न.प. सदस्य नंदू वैद्य व मुख्याधिकारी विजय देशमुख यांच्यावतीने बुधवारी दिवसभर केलेले प्रयत्न विफल ठरले. यानंतर खा. तडस यांच्या मध्यस्थीने गुरुवारी तोडगा काढण्यात आला.
सन २०१५-१६ या कालावधीचा न.प. च्या उत्पन्नातील ३ टक्के याप्रमाणे तीन लाखांचा धनादेश खा. तडस यांच्या हस्ते अपंगाच्या स्वाधीन करण्यात आला. तसेच सन २०१६-१७ या वर्षांचा तीन लाखांचा वाटा येत्या महिन्यात देण्याचे अभिवचन देण्यात आले. त्याचप्रमाणे न.प. च्या व्यापारी संकुलात अपंगासाठी तीन गाळ्यांचे आरक्षण तसेच दारिद्र्य रेषेखालील अपंगांना करात सवलत देण्याचे धोरण ठरविले. याप्रसंगी संघटनेचे प्रवीण फटींग, शैलेश सहारे, सुनील मिश्रा, मनीष कुंजरकर, धनराज घुमे, राजू पंपनवार, हरिभाऊ हिंगवे, रामेश्वर बाळपांडे, प्रमोद देऊळकर उपस्थिती होती.(प्रतिनिधी)