महावितरणच्या नुकसानीत फडणवीस सरकारचा मोठा वाटा; प्राजक्त तनपुरेंची टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2022 12:28 PM2022-02-21T12:28:06+5:302022-02-21T12:32:34+5:30
आपण फडणवीस सरकारच्या काळात महावितरणचे कसे नुकसान करण्यात आले हे स्पष्ट करू शकतो, असेही प्राजक्त तनपुरे म्हणाले.
वर्धा : राज्यातील फडणवीस सरकारच्या काळातच १० हजार कोटींवरील कृषिपंपांची थकबाकी ४० हजार कोटींवर गेल्याचे वास्तव आहे. त्यामुळेच महावितरणच्या नुकसानीत फडणवीस सरकारचा मोठा वाटा आहे, अशी टीका राज्याचे नगरविकास, ऊर्जा, आदिवासी विकास उच्च व तंत्रशिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी वर्धा येथील आयोजित पत्रकार परिषदेत केली.
तनपुरे पुढे म्हणाले, इतर राज्यांनी छोट्या-मोठ्या कंपन्यांना भरीव मदत केली; परंतु, राज्यातील फडणवीस सरकारच्या काळात महावितरणला तुटपुंजी मदत करण्यात आली. त्यामुळे या कंपनीच्या नुकसानीत अधिकच भर पडली. उदय योजनेच्या माध्यमातून महावितरण कंपनीला केवळ ४ हजार कोटींची मदत करण्यात आली आहे. केवळ कागदावर नफा दाखविण्यात आला. माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना आपण खुले आव्हान देतो की, त्यांनी समोरासमोर यावे. आपण फडणवीस सरकारच्या काळात महावितरणचे कसे नुकसान करण्यात आले हे स्पष्ट करू शकतो, असेही याप्रसंगी तनपुरे यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेला माजी आमदार प्रा. सुरेश देशमुख, ॲड. सुधीर कोठारी, सुबोध मोहिते, अतुल वांदिले, सुनील राऊत, अभिजित फाळके, आदींची उपस्थिती होती.
नगरपालिकांची निवडणूक महाविकास आघाडीसोबतच लढणार
आगामी नगरपालिकांची निवडणूक महाविकास आघाडीसोबतच लढण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसची आहे. असे असले तरी स्थानिक परिस्थिती बघूनही काही निर्णय पक्षश्रेष्ठींच्या मार्गदर्शनात घेण्यात येईल, असेही एका प्रश्नाला उत्तर देताना प्राजक्त तनपुरे यांनी स्पष्ट केले.