"भाजपने दिलेला ४०० पारचा नारा स्वत:ची समजूत काढणारा"

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2024 08:15 PM2024-02-18T20:15:16+5:302024-02-18T20:15:39+5:30

प्रकाश आंबेडकारांची सडकून टीका : ‘महाएल्गार’ सभेपूर्वी पत्रपरिषदेतून केले आरोप .

prakash ambedkar reaction on BJP 400 par slogan | "भाजपने दिलेला ४०० पारचा नारा स्वत:ची समजूत काढणारा"

"भाजपने दिलेला ४०० पारचा नारा स्वत:ची समजूत काढणारा"

वर्धा : भारतीय जनता पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीत ४०० जागा पार करण्याचे स्वप्न पाहत आहे. मात्र, हे सरकार दीडशे जागांचाही आकडा पार करु शकणार नाही, ४०० जागा जिंकण्याचा दावा हा नागरिकांची दिशाभूल करणारा असून केवळ स्वत:ची समजूत घालणाराच आहे. अशी टिका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी केली. 

वर्धा शहरात वंचित बहुजन आघाडीची महाएल्गार सभेपूर्वी त्यांनी स्थानिक विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.
भारतीय जनता पार्टी आणि आरएसएस हे दोघेही हिंदू धर्माचे प्रतिनिधी आहेत. आज देशात बहुतांश जनता ही पूर्णत: हिंदूच आहे. मग त्यासाठी धार्मिक राजकारण करण्याची गरज काय, मागील दहा वर्षांत जे वक्तव्य आणि कारवाई झाली त्यातून वैदीक परंपरा विरुद्ध संत परंपरा याची पुनरावृत्ती आताही दिसून येत आहे. संतांनी सामाजिक विचारसरणीची मांडणी केली ती सामूहिक आणि व्यक्तीस्वातंत्र या मुद्द्याला आधारुन होती. संतांच्या विचारांनी आधारित जे संविधान आहे त्याविरोधातच भाजप आणि आरएसएस दिसून येत असल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला. 

आज शरद पवारांना त्यांच्या मुलीला मुख्यमंत्री करायचे आहे. सोनिया गांधींना राहुल गांधीला तर देशाचे गृहमंत्री अमित शहा हे देखील पंत्रप्रधान पदाचे स्वप्न पाहत आहे. भाजप सरकार पूर्णपणे घाबरले आहेत. म्हणूनच ते पक्ष फोडाफोडीचे राजकारण करीत आहेत.  स्वताचे घर शाबुत ठेवण्यासाठी दुसऱ्यांचे घरं फोडण्याचा प्रयत्न भाजप सरकार करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. पत्रकार परीषदेला वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष मनोज वरखेडे, डॉ. निशा शेंडे, सुभाष खंडारे आदींसह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. 
  
जरांगेंचे आंदोलन यशस्वी झाल्यास सत्तेत उलथापालथ  
गेल्या अनेक महिन्यांपासून जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी लढत आहे. यासाठी त्यांनी आंदोलनही पुकारले होते. मात्र, त्यांना  तात्पुरता जीआर देऊन त्यांना आंदोलन मागे घेण्यास सरकारने प्रवृत्त केले. मात्र, पुन्हा जरांगेंनी उपोषण सुरु केले आहे. त्यांचे आंदोलन यशस्वी झाल्यास सत्तेत मोठी उलथापालथ होईल, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. 
  
इलेक्ट्राॅनिक उपकरण फुलप्रुफ आहे असे म्हणता येणार नाही 
२००४ च्या निवडणुकीत मी हरलो होतो. तेव्हा मी म्हटल होतं की मला इव्हीएमने पाडलं. कोणत्याही इलेक्ट्राॅनिक उपकरणाला डिकोडींग करण्यास आणि प्रीप्राेग्रामींग करण्यास वेळ लागत नाही. इव्हीएममध्ये फेरबदलही करता येतो. इव्हीएमच्या सुरक्षेबाबत वारंवार प्रश्नचिन्ह उभे राहत आहे. त्यामुळे इव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरनेच निवडणुका झाल्या पाहिजे. इलेक्ट्राॅनिक उपकरण हे फुलप्रुफ आहे, असे म्हणता येणार नाही. 
 
हिंदूंना देशाचे नागरिकत्व सोडून जावे लागले ही शोकांतिकाच 
१९५० ते २०१३ पर्यंद देशाचं नागरिकत्व सोडणाऱ्यांची संख्या सात हजार २०० इतकी होती. मात्र, २०१३ पासून आतापर्यंत २४ लाख कुटुंब तेही हिंदू कुटुंब ज्यांची मालमत्ता ५० हजार कोटी असेल अशांना देश सोडायला लावलं. त्यांनीही नागरिकत्व सोडून परदेशात जात नागरिकत्व स्वीकारले. देशाचं नागरिकत्व सोडणारा वर्ग हा संत परंपरेला मानणारा होता. त्यांच्यासमोर अशी परिस्थिती केली की त्यांना नागरिकत्वच सोडावं लागल. हिंदूंच्या राज्यात हिंदूंना देशाचं नागरिकत्व सोडण्यास प्रवृत्त करणे, ही मोठी शाेकांतिका असल्याची टिका प्रकाश आंबेडकर यांनी केली.

Web Title: prakash ambedkar reaction on BJP 400 par slogan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.