बंदीजनांच्या जीवनात प्रकाशदिवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 12:38 AM2017-12-01T00:38:12+5:302017-12-01T00:38:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : हातून कळत नकळत गुन्हे घडतात. यात काही गुन्हे गंभीर तर काही साधारण आहेत. यात गंभीर गुन्ह्यात शिक्षा भोगणाऱ्या बंद्यांना शिक्षा संपल्यानंतर समाजात मानाने जगता यावे याकरिता येथील महात्मा गांधी औद्योगिक शिक्षण संस्थेच्या माध्यमातून एलईडी दिवे बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. या बंदीजणांच्या माध्यमातून निर्माण झालेले दिवे बाजारातून अनेकांच्या घरातील अंधार दूर करण्याकरिता महत्त्वाचे ठरणार असून बंदिजणांच्या जीवनात प्रकाश देणारेच ठरणार आहे.
वर्धा कारागृहातील बंदिस्त १२ कैद्यांना महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिक संस्थेच्यावतीने १५ दिवसांचे एल.ई.डी. दिवे बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. यासाठी जिल्हा वार्षिक योजना नाविन्यपूर्ण योजनेमधून कौशल्य विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला. २ लक्ष ९३ हजार रुपयांमधून यासाठीचा कच्चा माल व साहित्य खरेदी करून कैद्यांनी विविध वॅटचे १५० दिवे बनविले.
बाजारात उपलब्ध दिव्यांमध्ये प्लास्टिकचे वेष्टन असलेले दिवे आहेत. बंद्यांनी बनवलेले दिवे हे अल्युमिनिअम वेष्टनात बनविले असल्यामुळे त्याची किंमत जास्त आहे; मात्र हे दिवे ५ वर्ष टिकणारे असून ५० हजार तास अविरत चालू शकतात. तसेच बिघडलेले किंवा मर्यादा संपलेले दिवे लाईट, सोलर दिवे यांचा समावेश आहे.
जिल्हाधिकारी शैलश नवाल यांनी कारागृहात भेट देवून प्रशिक्षण प्रकल्पाची पाहणी करून मी बंदीजणांशी संवाद साधला. यावेळी एमगिरीचे व्यवस्थापक प्रफुल्ल काळे, जिल्हा कारागृह अधीक्षक अनिल खामकर, एमगिरीचे अधिकारी रविकुमार, एस.पी. वाघाडे यांच्यासह कारागृहाचे अधिकारी उपस्थित होते.
बंदी बांधवांनी सोलर कृषी पंपही बनवावे - शैलेश नवाल
बाजारपेठेत असलेल्या कमी किमतीच्या दिव्यांशी स्पर्धा करण्याकरिता प्लास्टिक वेष्टन असलेले कमी किमतीचे दिवे सुद्धा तयार करावेत. आता बनविलेले दिवे सुद्धा विक्रीसाठी ठेवावेत. ग्राहकांना स्वताच दोन्ही दिव्यांची चाचणी घेतल्यानंतर ग्राहकांना जास्त दिवस चालणाºया दिव्यांविषयी खात्री पटवून याला जास्त ग्राहक मिळतील. बंद्यांनी ५ किलो वॅटचे सोलर पंप बनवावे. यामुळे शेतकऱ्यांना कमी दरात सोलर पंप उपलब्ध होतील. आशा प्रकल्पामुळे कैद्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळून त्यांची शिक्षा पूर्ण झाल्यावर या प्रशिक्षणामुळे रोजगाराची संधी उपलब्ध होईल, अशी आशा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी यावेळी व्यक्त केली.