नववर्ष उत्सव बंदोबस्ताकरिता पोलीस प्रशासन सज्ज
By admin | Published: December 30, 2016 12:39 AM2016-12-30T00:39:22+5:302016-12-30T00:39:22+5:30
आगामी २०१७ नववर्ष व सन २०१६ वर्षाच्या निरोपाकरिता मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा होतो.
दारूबंदीच्या कारवाईकरिता ‘ब्रेथ अॅनालायझर’
वर्धा : आगामी २०१७ नववर्ष व सन २०१६ वर्षाच्या निरोपाकरिता मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा होतो. सदर उत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने व वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्याकरिता वर्धा जिल्हा पोलीस दल सुसज्ज आहे. सदर कार्यक्रमामध्ये व जल्लोष करताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याकरिता पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे.
वर्धा जिल्यात मद्य पिवून वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांना प्रतिबंध करण्याकरिता ब्रेथ अॅनालायझर यंत्र रुजू करण्यात आले आहे. येत्या काळात प्रभावी अंमलबजावणीकरिता या यंत्राचा वापर करून मद्य पिवून वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात येणार आहे.
नियमबाह्यरित्या मोठ्या आवाजात संगीत व वाद्य वाजवून नियमांचा भंग करणाऱ्यांवर प्रतिबंध करण्याकरिता शासन अधिकृत ध्वनीमापन यंत्रे जिल्हा आस्थापनेवर नव्याने रुजू करण्यात आलेली आहेत. नववर्ष उत्सव काळादरम्यान त्याद्वारे मोठ्या आवाजातील ध्वनिक्षेपके व डीजेचा नियमबाह्य वापर करण्याऱ्यांवर प्रभावी कारवाई करण्यात येणार आहे.
नववर्ष उत्सवादरम्यान वर्धा जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याकरिता जास्तीत जास्त पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांना बंदोबस्ताकरिता नेमून जिल्ह्यात अप्रिय घटना होणार नाही याची खबरदारी वर्धा पोलिसांमार्फत घेण्यात येणार आहे.
नागरिकांनी कोणत्याही अप्रिय घटनांबाबत तात्काळ नियंत्रण कक्ष वर्धा येथे माहिती देण्याबाबत पोलीस अधीक्षक यांनी नागरिकांना आवाहन केलेले आहे. (प्रतिनिधी)