आयटी गुन्ह्याच्या तपासाकरिता पथक तयार
By admin | Published: August 27, 2016 12:19 AM2016-08-27T00:19:58+5:302016-08-27T00:19:58+5:30
एटीएमचा कोड विचारत फसवणूक करण्याचे अनेक प्रकार वर्धेत घडले आहेत. या गुन्ह्यांपैकी १६ गुन्ह्यांचा अभ्यास केला
१० कर्मचाऱ्यांच्या पथकाकडे १६ गुन्ह्यांचा तपास : बिहार व झारखंड येथे लिंक
वर्धा : एटीएमचा कोड विचारत फसवणूक करण्याचे अनेक प्रकार वर्धेत घडले आहेत. या गुन्ह्यांपैकी १६ गुन्ह्यांचा अभ्यास केला असता त्यांची लिंक बिहार व झारखंड या राज्यात असल्याचे समोर आले आहे. या गुन्ह्याच्या तपासाकरिता वर्धा पोलिसांचे १० कर्मचाऱ्यांचे एक पथक तयार करण्यात आले असून ते लवकरच या मोहिमेवर जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
सध्याचे युग संगणकीय युग म्हणून ओळले जात आहे. याचा जेवढा लाभ होत आहे तेवढेच नुकसान होत असल्याचे समोर येत आहे. नागरिकांकरिता आर्थिक व्यवहार सोयीचे व्हावे याकरिता विविध बँकांकडून एटीएमची सुविधा सुरू करण्यात आली आहे. या सुविधेतूनही नागरिकांची फसवणूक होत असल्याचे समोर आले आहे. ही फसवणूक आॅनलाईन होत असल्याने यातील एका गुन्ह्याचा शोध घेणे पोलिसांकरिता अवघड जात असल्याचे समोर आले. यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पराग पोटे यांनी जिल्ह्यातील आठही तालुक्यात घडलेल्या घटना एकत्र करून त्याचा अभ्यास करून या सर्वच गुन्ह्याचा एकच वेळी तपास करणे शक्य असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिली. यावर पोलीस अधीक्षकांनी या कल्पनेला हिरवी झेंडी देत पथक नेमण्याची परवानगी दिली आहे.
यानुसार जिल्ह्यातील २० पैकी ज्या ठाण्यात असे गुन्हे घडले त्याची माहिती घेतली. यातील १६ प्रकरणाचा अभ्यास करण्यात आला असता त्यांची लिंक बिहार व झारखंड राज्यातील विविध भागात असल्याचे दिसून आले. यामुळे या प्रकरणाचा तपास करणे सायीचे होईल, असे वाटले. यावरून १० कर्मचाऱ्यांच्या दोन चमू तयार करण्यात आल्या आहेत. यातील पाच कर्मचारी बिहार व पाच कर्मचारी झारखंड राज्यात जात तपास करणार असल्याची माहिती आहे.(प्रतिनिधी)