सेवाग्राम आश्रमाच्या अध्यक्षपदाचा तिढा सुटेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2020 12:04 PM2020-07-22T12:04:51+5:302020-07-22T12:06:07+5:30
सर्व सेवा संघाने अधिसूचना काढून आश्रमाचे मंत्री मुकुंद मस्के यांच्याकडे अध्यक्षपदाचा प्रभार सोपवून त्यांना सहकार्य करण्यासाठी मार्गदर्शक समिती गठित केली आहे. त्यामुळे आता आश्रमातील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : जगाला सत्य, अहिंसा, प्रेमाचा संदेश देणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या सेवाग्राम आश्रमात सध्या आश्रम प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदाचा वाद सुटताना दिसत नाही. आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष टी.आर.एन.प्रभू यांना सर्व सेवा संघाने पदमुक्त केले तरी ते आजही सक्रिय आहेत. सर्व सेवा संघाने अधिसूचना काढून आश्रमाचे मंत्री मुकुंद मस्के यांच्याकडे अध्यक्षपदाचा प्रभार सोपवून त्यांना सहकार्य करण्यासाठी मार्गदर्शक समिती गठित केली आहे. त्यामुळे आता आश्रमातील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल आस्था असलेले टी.आर.एन.प्रभू यांनी २०१८ मध्ये आश्रम प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली. पण, दोन वर्षांनंतर त्यांच्या पदाबद्दल कुरबूर सुरू झाल्याने सर्व सेवा संघाचे अध्यक्ष महादेव विद्रोही यांनी अनुशासनहिनता आणि आश्रमाच्या मर्यादेचा भंग केल्याचा ठपका ठेवत १८ मार्च २०२० रोजी प्रभू यांना अध्यक्षपदावरून पायउतार केले. त्यानंतर लगेचच प्रभू यांनी हे सर्व आरोप चुकीचे असल्याचे सांगून आपणच राजीनामा देत असल्याचे त्यांनी एका पत्रातून आश्रम संचालकांसह गांधीवाद्यांना कळविले.
जानेवारी २०२० मध्ये मुंबईत सर्व सेवा संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली. त्यात प्रभू यांना राजीनामा देण्यासाठी सांगितले होते. तसेच नवीन अध्यक्ष होईपर्यंत मंत्री असलेले मुकुंद मस्के यांच्याकडे पदभार सोपविला होता. लॉकडाऊनमुळे सर्व सेवा संघाच्या राष्ट्रीय कार्यकारणीची जूनमध्ये आॅनलाईन बैठक झाली. यात आश्रमाच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी भवानी शंकर कुसुम यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यांची समिती गठित करून समाधान शोधून अहवाल सादर करण्याची जबाबदारी सोपविली होती.
समितीने जून महिन्यात अहवाल सादर केला. २९ जूनच्या बैठकीत अहवालावर विचार विनिमय करून सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानच्या कामकाजासाठी मार्गदर्शक समिती गठित करण्यात आली. यामध्ये माजी अध्यक्ष अॅड. मा. म. गडकरी, छत्तीसगड सर्वोदय मंडळाचे अध्यक सियाराम साहू आणि वर्धा जिल्हा सर्वोदय मंडळाचे अध्यक्ष मोहन खैरकार यांचा समावेश आहे. नवीन अध्यक्ष नियुक्तीपर्यंत प्रभारी अध्यक्ष म्हणून मंत्री मुकुंद मस्के समितीच्या मार्गदर्शनात कार्य करतील, असे पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे आश्रमातील अध्यक्षपदाचा वाद केव्हा निवळेल, हे सांगता येणार नाही.
आश्रम प्रतिष्ठानचे मंत्री मुकुंद मस्के यांच्याकडे अध्यक्षपदाचा प्रभार सोपविण्यात आला आहे. त्यांना सहकार्य करण्याकरिता तीन सदस्यांची मार्गदर्शन समिती गठित करण्यात आली आहे. या समितीच्या मार्गदर्शनात मस्के हे कार्य करतील.
- महादेव विद्रोही, अध्यक्ष,सर्व सेवा संघ.