पत्रकार परिषद : जिल्हा पोलीस अधीक्षकांची माहिती
By Admin | Published: June 28, 2017 12:56 AM2017-06-28T00:56:00+5:302017-06-28T00:56:00+5:30
शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी वाहतूक पोलीस शाखा प्रयत्नरत आहे. वाहन धारकांना शिस्त लागावी म्हणून
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी वाहतूक पोलीस शाखा प्रयत्नरत आहे. वाहन धारकांना शिस्त लागावी म्हणून उपाययोजना केल्या जात असून दंडात्मक कारवाईही केली जात आहे. २६ दिवसांत शहरात ३ हजार ७२५ प्रकरणांत ४ लाख ७२ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल केला. शिवाय पार्किंग, सिग्नल व्यवस्थेत सुधारणा करण्याचे प्रयत्न असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. यांनी सांगितले.
वाहतूक व्यवस्थेतील सुधारणा व कारवाईबाबत माहिती देण्याकरिता पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी त्या बोलत होत्या. त्या पूढे म्हणाल्या की, बजाज चौक, आर्वी नाका येथे सुयोग्यरित्या ड्रम बॅरीकेटींग केले आहे. शहरात पोलीस दलामार्फत महत्त्वाच्या सर्व चौकांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. या यंत्रणेमार्फत महत्त्वाच्या ठिकाणी वाहतूक नियमन करण्यात येत आहे. सराफा व बाजार लाईनमध्ये पी-१, पी-२ पार्कींग व्यवस्था केली आहे. पिवळे पट्टे मारले आहे. पार्कींगचे उल्लंघन केल्या प्रकरणी पाच दिवसांत १८५ वाहन चालकांवर कारवाई करून २७ हजार ७५० रुपये दंड वसूल केला.
डॉ. आंबेडकर चौकात बॅरीकेटींग करून राँग साईडने येणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई सुरू आहे. पाच दिवसांत ८०० केसस नोंद करीत ८० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. महत्त्वाच्या चौकांत चौक्या उभारून वाहतूक नियमन करणार आहे. सिंदी मार्केटमधील अतिक्रमण न.प. च्या साह्याने हटवून टूव्हीलर पार्कींग तर शहर ठाण्याजवळ फोर व्हीलर पार्कींग व्यवस्था केल्याचेही पोलीस अधीक्षक निर्मलादेवी यांनी सांगितले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी माधव पडिले, वाहतूक पोलीस शाखेचे दत्तात्रय गुरव आदी उपस्थित होते.
इलेक्ट्रॉनिक सिग्नल लागणार
बजाज चौक, आर्वी नाका, शिवाजी चौक येथे इलेक्ट्रॉनिक सिग्नल व्यवस्था सुरू करण्याबाबत पालिकेला वाहतूक शानेने नाहरकत प्रमाणपत्र दिले आहे. दोन महिन्यांत इलेक्ट्रॉनिक सिग्नल सुरू होणार आहे. वर्र्धा शहरात अवजड वाहनांना सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत प्रवेश मनाई करण्यात आलेली आहे. मार्केट परिसरातही काही मार्ग एकेरी करण्यात आले आहेत.