हिंदी विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या राजीनाम्यासाठी वाढला दबाव
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2023 10:46 AM2023-08-05T10:46:39+5:302023-08-05T10:48:04+5:30
सामाजिक संघटनांनंतर प्राध्यापकाचीही मागणी
वर्धा : येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ विविध कारणांनी चर्चेत असते. आता एका नव्या प्रकरणामुळे हे विद्यापीठ वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर येथील कुलगुरू प्रा. रजनीशकुमार शुक्ल यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. सामाजिक संघटनांनंतर आता विद्यापीठातील प्राध्यापकानेही त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
महात्मा गांधी हिंदी विश्व विद्यालयाच्या परिसरामध्ये महिलेशी असभ्य वर्तन केल्यासंदर्भात १ जून आणि २६ जून २०२३ च्या रात्री घडलेल्या घटनेनंतर सर्वत्र खळबळ उडाली होती. या घटनेशी संबंधित संवादाचे स्क्रीनशॉट व्हाॅट्सॲप आणि एसएमएसच्या माध्यमातून व्हायरल झाले होते. या घटनेमुळे विद्यापीठासह समाजामध्येही रोषाचे वातावरण असून, सामाजिक संघटनांकडून कुलगुरू हटावची मागणी होत आहे.
आता विद्यापीठ शिक्षक संघाचे अध्यक्ष डॉ. धर्वेश कटारिया यांनीही कुलगुरू प्रा. रजनीशकुमार शुक्ल यांना निवेदन देऊन नैतिकतेच्या आधारावर त्यांनी पदाचा राजीनामा देण्याची मागणी केली आहे. कुलगुरूंच्या राजीनाम्याचा प्रस्ताव शिक्षक संघटनेने सर्व शिक्षकांसमोर ठेवला असता, सर्वांनी या प्रस्तावाला मान्यता दिल्याचे निवेदनात नमूद केले आहे. राजीनाम्याकरिता कुलगुरूंवर दबाव वाढत असून, हे प्रकरण आणखी काय वळण घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तर गांधी पुतळ्यासमोर प्रार्थना करणार
विद्यापीठ अनुदान आयोग नियम २०१८ च्या मुद्दा क्रमांक १७.० मध्ये नमूद केलेल्या व्यावसायिक आचारसंहितेचे पालन करण्यासाठी कुलगुरूंनी राजीनामा द्यावा. जर त्यांनी राजीनामा दिला नाही तर सर्व वैधानिक संस्थांना पत्र पाठवून महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर बसून प्रार्थना करणार, असा इशाराही डॉ. कटारिया यांनी दिला आहे.