रासायनिक खतांचे दर वधारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 10:44 PM2018-07-18T22:44:25+5:302018-07-18T22:44:42+5:30

The prices of chemical fertilizers rose | रासायनिक खतांचे दर वधारले

रासायनिक खतांचे दर वधारले

googlenewsNext
ठळक मुद्देविक्रीवर परिणाम : शेतकऱ्यांच्या अडचणीत भर

महेश सायखेडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : यंदाच्या वर्षी सुरूवातीला पावसाने दगा दिल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या होत्या; पण त्यानंतर झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामांना गती दिली. सध्या स्थितीत शेतकरी उभ्या तूर, सोयाबीन व कपाशी पिकांची निगा घेत त्यांना खत देत विविध औषधांची त्यावर फवारणी करीत आहेत. अशातच यंदा मे महिन्याच्या तुलनेत सध्या खतांच्या दरात सरासरी सव्वाशे रुपयांनी वाढ झाल्याने शेतकºयांच्या अडचणी भर पडली आहे. शिवाय विक्रीवरही त्याचा परिणाम होत असल्याचे कृषी केंद्र व्यावसायिक सांगतात.
निसर्गाच्या लहरीपणाचा गत तीन वर्षांपासून शेतकºयांचा आर्थिक फटकाच सहन करावा लागत आहे. अशातच गत वर्षी तूर, सोयाबीन व कापूस पिकाला उत्पादन खर्चावर आधारीत दर मिळाला नाही. त्यावेळी शेतकºयांच्या अडचण लक्षात घेवून अनेक व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लुबाडणूकच करण्यात आल्याचे शेतकरी सांगतात. यंदाच्या वर्षीतरी शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेवून विविध शेतमाल निघण्यापूर्वीच विविध पिकांना देण्यात येणारा भाव सरकारने निश्चित करावा, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे.
यंदाच्या मे महिन्यात युरीयाची ५० किलोची बॅग २९५ रुपयांना, पोट्याशची ५८० रुपयांना, १०/१६/१६ खत १ हजार ४५ रुपये, १२/३२/१६ खत १ हजार ५५ रुपये, १८/४६/० डिएपी १ हजार ८५ रुपयांना बाजारात विक्रीकरिता उपलब्ध होते. परंतु, जुलै महिन्याच्या तिसºया आठवड्याच्या सुरूवातीला युरीयाची ४५ किलोची बॅग २६६.५० रुपयांना, पोट्याशची बॅग ७४० रुपयांना, १०/१६/१६ खत १ हजार १६० रुपये, १२/३२/१६ खत १ हजार १७० रुपये तर १८/४६/० डिएपी १ हजार ३४० रुपयांना विक्री होत आहे. खतांच्या दरात सुमारे १२५ ते १५० रुपयांनी वाढ झाली असून याचा आर्थिक फटकाच शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.
वस्तूसेवा कराने वाढविली डोकेदुखी
खत, बियाणे, औषधे आदी शेतीसाहित्यांवर सरकारने वस्तूसेवा कर लादला आहे. त्यामुळे सरकारच्या तिजोरीत कराच्या स्वरूपात पैसा येत असला तरी लादण्यात आलेल्या वस्तूसेवा करने शेतकऱ्यांसह कृषी केंद्र व्यावसायिकांची डोकेदुखीच वाढविली असल्याचे बोलले जात आहे.
माल एकच; पण कंपन्यांचे दर वेगवेगळे
फर्टीलाईझर साहित्यावर सरकारने ५ टक्के, औषधांवर १८ टक्के तर काही कृषी साहित्यांवर १८, २४ व १२ टक्के वस्तूसेवा कर लावला आहे. सध्या हा वस्तूसेवा कर शेतकºयांसह कृषी केंद्र व्यावसायिकांच्या अडचणीत भर टाकत असून खतांचा माल एकच असताना वेगवेगळ्या कंपन्या आपले प्रोडक्शन वेगवेगळ्या दरात विकत आहेत. त्यामुळे अधिकचा आर्थिक फटकाच शेतकºयांना सहन करावा लागत आहे.
काँग्रेसची सत्ता असताना शेतकºयांना खतावर सवलत दिली जात होती. परंतु, सध्या ती सवलत दिली जात नाही. त्यामुळे अनेक शेतकºयांना त्यांच्या सौभाग्यवतीचे मंगळसूत्र गहाण ठेवूनच शेतीउपयोगी साहित्याची खरेदी करावी लागत असल्याचे वास्तव आहे.

वस्तूसेवा करामुळे कृषी केंद्र व्यावसायिकांच्या व शेतकºयांच्या अडचणीत भर पडली आहे. कृषी साहित्य विक्रीचा व्यवसाय करताना सध्या विचारपुर्वकच करावा लागत आहे. स्पर्धेच्या युगात शेतकºयांची फसगत होत असल्याचे वास्तव आहे. शेतकºयांनीही दक्ष राहून विविध साहित्याची खरेदी करावी.
- रवी शेंडे, अध्यक्ष, कृषी केंद्र व्यावसायिक असो.

खतांच्या दरात अवघ्या दोन महिन्यांच्या आत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने चांगलाच आर्थिक फटका सहन सध्या करावा लागत आहे. शेती करताना जो खर्च होतो त्या तुलनेत हंगामाच्या अखेरीस विविध शेतमालाला भाव मिळत नाहीत. सरकारने शेतमालांना उत्पादन खर्चावर आधारित योग्य भाव जाहीर करावा.
- सुनील हिवंज, शेतकरी, सेलूकाटे.

बहूदा कृषी केंद्र चालक घेतलेल्या साहित्याचे बिल देण्यास टाळाटाळ करतात. शिवाय काही कृषी केंद्र चालक उधारीत साहित्य देताना देयकाची वसूली व्याजासह करतात. हा प्रकार बंद झालाच पाहिजे. शिवाय होणारी शेतकºयांची पिळवणूक थांबली पाहिजे.
- राहूल चौधरी,
शेतकरी, गोविंदपूर.

Web Title: The prices of chemical fertilizers rose

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.