जीवनावश्यक वस्तूंचे दर वधारले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 09:54 PM2019-04-17T21:54:47+5:302019-04-17T21:55:27+5:30
विदर्भातील पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात लोकसभेकरिता मतदान पार पडले. निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच जीवनावश्यक वस्तूंचे दर सरासरी ३० ते ४० टक्क्यांपर्यंत वधारले. राजकीय पक्षांचे नेते, लोकप्रतिनिधी निवडणूक प्रचारात व्यस्त असताना दुसरीकडे सर्वसामान्य महागाईने होरपळताना दिसून आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : विदर्भातील पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात लोकसभेकरिता मतदान पार पडले. निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच जीवनावश्यक वस्तूंचे दर सरासरी ३० ते ४० टक्क्यांपर्यंत वधारले. राजकीय पक्षांचे नेते, लोकप्रतिनिधी निवडणूक प्रचारात व्यस्त असताना दुसरीकडे सर्वसामान्य महागाईने होरपळताना दिसून आले. गहू, ज्वारी, डाळी, तांदूळ, साबुदाणा महागल्याने सर्वसामान्यांचे अर्थकारण कोलमडले.
मागील तीन महिन्यांत तूर डाळीच्या भावात किलोमागे ९ रुपयांनी वाढ होऊन ७४ ते ७५ रुपये प्रतिकिलो, हरभरा डाळ ६ ते ८ रुपयांनी वधारून ५८ ते ६० रुपये, मठ डाळ १२ रुपयांनी वाढून ८२ ते ८४ रुपये, मूग व उडीद डाळीत २ रुपयांनी वाढ होऊन अनुक्रमे ७६ ते ७८ रुपये, ६२ ते ६४ रुपये प्रतिकिलोप्रमाणे विक्री होत आहे. तांदूळ क्विंटलमागे दोन ते अडीच रुपयांनी महाग होऊन २८ ते ११२ रुपयांपर्यंत विक्री होत आहे.
गव्हाची मध्य प्रदेश आणि राजस्थानातून मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याने गव्हाच्या भावावर जास्त परिणाम दिसून आला नाही. बाजारपेठेत जीवनावश्यक वस्तूंसह इतर वस्तूंची सातत्याने दरवाढ सुरूच आहे. पाणीटंचाईमुळे भाजीपाल्याचेही भाव कडाडले आहे. टमाटर, वांगी वगळता सर्वच भाजीपाल्याचे भाव वधारले आहेत. डाळींचा वापर करावा, त्याही महागल्याने गृहिणींचे अर्थकारण कोलमडले आहे. दरवाढ नियंत्रणात आणेल कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.