पंतप्रधानांच्या योजनेचा गॅस सिलिंडरवरूनही प्रचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 12:54 AM2018-03-24T00:54:50+5:302018-03-24T00:54:50+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सत्तारूढ झालेल्या भाजप सरकारने सरकारी योजनांच्या जाहिराती विविध माध्यमातून केल्या.
ऑनलाईन लोकमत
वर्धा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सत्तारूढ झालेल्या भाजप सरकारने सरकारी योजनांच्या जाहिराती विविध माध्यमातून केल्या. या जाहिराती आता गॅस सिलिंडरवरून करण्यात येत असल्याने महिलांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या सिलिंडरवर पंतप्रधान उज्ज्वला योजनेची जाहिरात करणे सुरू केले आहे. त्यामुळे हे योजनेचे सवलतीचे सिलिंडर आपल्याला देण्यात आले असावे, असा संशय महिलांमध्ये निर्माण झाला आहे.
महिलांची धुरापासून मुक्तता व्हावी या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान उज्ज्वला योजना देशभरात सुरू केली. ज्या कुटुंबाकडे गॅस सिलिंडर नाहीत. अशा कुटुंबाना नाममात्र शुल्कात गॅस सिलिंडर उपलब्ध करून देण्यात आले. वर्धा जिल्ह्यात जवळजवळ ४० हजार कुटुंबाला या योजनेचा लाभ मिळाला, अशी माहिती पुढे आली आहे. या योजनेचे फलक पेट्रोलपंपावर तसेच बसेसवर लावण्यात आले आहे. आता याच्या पुढे जावून सिलिंडरवरच या योजनेची जाहिरात सुरू करण्यात आली आहे.
अनेक घरी वितरकाकडून योजनेची जाहिरात असलेले सिलिंडर देण्यात येत आहे. हे सिलिंडर सवलतीचे असावे किंवा योजनेचे सिलिंडर आपल्याला जास्त पैसे घेऊन दिले असावे, अशी संभ्रमाची भावना ग्राहकाच्या मनात निर्माण झाली आहे. इंग्रजी व मराठी अशा दोन्ही भाषेत ही जाहिरात सिलिंडरवर करण्यात आली.