विकास कामात रस्त्यासह सौंदर्यीकरणाला प्राधान्य द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 10:00 PM2017-08-30T22:00:46+5:302017-08-30T22:01:04+5:30
सिंदी नगर पालिकेला शासनाकडून मंजूर झालेल्या १० कोटीच्या विशेष निधीतून शहरातील मुख्य रस्त्यांसह सौदर्यीकरणाची कामे करण्याची मागणी....
लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदी (रेल्वे) : सिंदी नगर पालिकेला शासनाकडून मंजूर झालेल्या १० कोटीच्या विशेष निधीतून शहरातील मुख्य रस्त्यांसह सौदर्यीकरणाची कामे करण्याची मागणी विविध पक्षाच्या व संघटनेच्यावतीने आमदार समीर कुणावार यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
सिंदी शहराच्या विकासाकरिता आमदार समीर कुणावार यांनी नगर परिषदेत सत्ता नसताना कोटींचा विशेष निधी शासनाकडून दोन वर्षांपूर्वी मंजूर करून घेतला आहे. त्यात गावातील रस्ते व नाली बांधकाम व बाजार चौक सौंदर्यीकरण आदी कामे घेण्यात आली होती. या निधीतून गावातील अनेक विकास कामे अपेक्षीत होते. पण, मुख्य हेतुला डावलल्या जात आहे. शहर विकासासाठी प्राप्त झालेल्या १० कोटींच्या विशेष निधीतून शहराकरीता मैदाने, बगीचे, टाऊन हॉल (सांस्कृतिक हॉल), अभ्यासिका, माता मंदिर ते मांगली रोडपर्यंत उडाण पुल, बॅडमिंटन खेळण्याकरिता उडणकोट, हायमास्क, बस स्टॅण्ड पिपरा नालापर्यंत सिमेंट रस्ता आदी कामे करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देताना अमोल सोनटक्के, आशिष देवतळे, आनंद छाजेड आदींची उपस्थिती होती. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान नागरिकांच्या मागणीवर सकारात्मक विचार करून योग्य निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन आ. कुणावर यांनी दिले.