प्रीतीश देशमुखला होता आलिशान गाड्यांचा मोह; VIP क्रमांकांसाठी ८ लाख मोजले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2021 06:23 AM2021-12-25T06:23:21+5:302021-12-25T06:23:58+5:30
प्रीतीशचे राहणीमान अचानक बदलल्याने त्याचे शेजारी आणि ओळखीच्या लोकांनी तोंडात बोटे घालणेच काय ते बाकी राहिले आहे.
चैतन्य जोशी, लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : आरोग्य विभागासह विविध परीक्षांच्या पेपरफुटी घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार डॉ. प्रीतीश देशमुख याला आलिशान गाड्यांचा छंद असल्याची चर्चा रंगू लागली आहे. प्रीतीशने पुण्यासह वर्धा व लगतच्या परिसरात संपत्ती खरेदी केल्याचीही चर्चा आहे. प्रीतीशचे राहणीमान अचानक बदलल्याने त्याचे शेजारी आणि ओळखीच्या लोकांनी तोंडात बोटे घालणेच काय ते बाकी राहिले आहे.
प्राथमिक शिक्षण वर्ध्यात झाल्यानंतर प्रीतीशने वैद्यकीय शिक्षण नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून पूर्ण केले. त्यात त्याला अनेक अडचणी आल्या. त्याने कसेबसे वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. अभ्यासात त्याला फारशी रूची नव्हती, अशी माहिती त्याच्या वर्गमित्रांनी ‘लोकमत’ला दिली. त्यानंतर तो पुण्याला गेला. तेथे त्याने मंत्रालयातून सेटिंग लावून विविध टेंडर मिळविले. अल्पावधीतच त्याने कोट्यवधींची माया जमा केली. विविध परीक्षांच्या घोटाळ्यांत तो सापडला आणि त्याच्याकडील खजिन्याचा पेटाराच उघडला. डॉ. प्रीतीश याला महागड्या गाड्यांचाही मोह होता.
२४ ऑक्टोबर २०१८ रोजी एक अलिशान गाडी घेतली. त्यानंतर २८ एप्रिलला आणखी एक महागडी गाडी खरेदी केल्याची नोंद उपप्रादेशिक परिवहन विभागात आहे इतकेच नव्हे तर, त्याने विविध ठिकाणी अनेक कोटींची गुंतवणूक केल्याची माहितीही पुढे येऊ लागली आहे.
प्रीतीशला ०००९ या व्हीआयपी क्रमांकाचे वेड लागले. त्याने २०१८ मध्ये खरेदी केलेल्या अलिशान गाडीला ०००९ क्रमांक घेतला. त्यानंतर २८ एप्रिलला २५ ते ३० लाखांत घेतलेल्या दुसऱ्या गाडीलाही हाच क्रमांक विकत घेतला. हा व्हीआयपी क्रमांक मिळविण्यासाठी ८ लाख मोजल्याचे पुढे आले आहे.