दिवाळीकरिता गावाकडे येणाऱ्यांचे दिवाळे; ट्रॅव्हल्सच्या प्रवासी भाड्यात भरमसाठ वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2022 12:16 PM2022-10-21T12:16:00+5:302022-10-21T12:21:39+5:30
रेल्वेगाड्या रद्दचा फटका
वर्धा : दिवाळीनिमित्त नोकरी व शिक्षणाकरिता पुणे, मुंबईत राहणारे व्यक्ती आपल्या गावाकडे येत असतात. याकरिता रेल्वेलाच प्रथम प्राधान्य देत तिकिटांचे बुकिंगही करून ठेवतात. मात्र, आता ऐन दिवाळीच्या तोंडावर रेल्वे प्रशासनाने तांत्रिक बिघाडाचे कारण पुढे करून रेल्वेगाड्या रद्द करण्याचा सपाटा चालविला आहे. याचाच फायदा खासगी ट्रॅव्हल्स एजन्सीने उचलून तिकिटांच्या दरात भरमसाठ वाढ केल्याने आता गावाकडे येणाऱ्यांच्या खिशावर चांगलाच ताण पडत आहे.
जिल्ह्यातील असंख्य विद्यार्थी व नागरिक नोकरी आणि शिक्षणाच्या निमित्ताने पुणे, मुंबई या मोठ्या शहरांमध्ये वास्तव्यास आहेत. दिवाळीला ते आपल्या गावी येत असतात. त्याकरिता त्यांची आधीपासून तयारी सुरू होऊन ते रेल्वेचे तिकीटही बुक करून ठेवतात. यावर्षीही बहुतांश जणांनी रेल्वेचे तिकीट बुक केले होते. दिवाळीचा आनंदोत्सव परिवारासोबत कसा साजरा करावा, याबाबत कार्यक्रमही आखला होता. मात्र, ऐन सणाच्या दिवसात रेल्वे रुळाच्या देखभाल-दुरुस्तीकरिता रेल्वेगाड्या रद्द केल्यात. त्यामुळे अनेकांचे तिकीट रद्द झाल्याने त्यांच्या आनंदोत्सवावर विरजण पडले आहे.
खासगी ट्रॅव्हसचे तिकीटही वर्धा ते पुणे, मुंबईकरिता सहा हजारांच्या वर असल्याने या दिवाळीत गावाकडे जाणे नको रे बाबा! असे म्हणण्याची वेळ आली आहे. त्यामुळे मोठा रोष व्यक्त होत आहे. सारेच दिवाळीला गावाकडेे येण्यासाठी आसुसले आहे. त्यांच्याकरिता शासनाने व्यवस्था करण्याची मागणी होत आहे.
दहा रेल्वेगाड्या झाल्या रद्द
दिवाळीच्या तोंडावरच वर्धा ते पुणे मार्गावर धावणाऱ्या एक-दोन नाही तर तब्बल दहा गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये निजामुद्दीन पुणे, महाराष्ट्र एक्स्प्रेस, पुणे-अजनी, भुसावळ-पुणे, पुणे-भुसावळ, पुणे-नागपूर आणि नागपूर-पुणे या रेल्वेगाड्यांचा समावेश आहे. त्यामुळे पुण्यावरून वर्ध्याला येणाऱ्यांचा रेल्वे प्रवासच अडचणीत आला आहे.
पुणे येथून विदर्भातील सर्व जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व प्रवासी प्रवास करतात. काही महिन्यांपासून पुणे-नागपूर दरम्यान जवळपास सर्वच रेल्वेगाड्या वारंवार रद्द करण्यात येत आहेत. पुणे-नागपूर दरम्यानच्या रेल्वेगाड्या सुरू ठेवणे व त्याला पर्यायी मार्ग काढणे ही रेल्वे विभागाची प्राथमिकता असली पाहिजे. गाड्या सरसकट रद्द करण्यापेक्षा पर्यायी मार्गाने म्हणजेच पनवेल-कल्याण-इगतपुरी-मनमाडमार्गे नागपूर-पुणे दरम्यानची वाहतूक वळविल्यास सरसकट गाड्या रद्द होणार नाही आणि प्रवाशांचीही गैरसोय होणार नाही, असे पत्र रेल्वेमंत्र्यांना पाठविले आहे.
रामदास तडस, खासदार, वर्धा