सिंदी (रेल्वे) च्या बैल पोळ्यात सन्मानाची पैज
By Admin | Published: September 12, 2015 01:55 AM2015-09-12T01:55:44+5:302015-09-12T01:55:44+5:30
संपूर्ण विदर्भात प्रसिध्द असलेल्या तान्हापोळ्या प्रमाणेच येथील बैल पोळा सुध्दा आगळावेगळा असतो.
प्रशांत कलोडे सिंदी (रेल्वे)
संपूर्ण विदर्भात प्रसिध्द असलेल्या तान्हापोळ्या प्रमाणेच येथील बैल पोळा सुध्दा आगळावेगळा असतो. सन्मानासाठी लागलेली बैलाची ही पैज बघण्याकरिता नागरिकांची येथील पोळ्याला प्रचंड गर्दी असते.
तान्हा पोळ्यासह येथील मोठ्या बैलाच्या जोड्याचीही विदर्भात वेगळीच छाप आहे. पोळ्यात आपलीच बैलजोडी प्रथम यावी यासाठी शेतकरी दरवर्षी चार महिन्यांपूर्वीच नवीन व महागडी बैलजोडी खरेदी करतात. ही बैलजोडी थेट पोळ्याच्या दिवशीच लोकांच्या समक्ष येते. यात कोणाची बैलजोडी बाजी मारते याकडे साऱ्यांचे लक्ष असते. येथे होणाऱ्या सन्मानाला विशेष महत्त्व आहे.
यासाठी येथील शेतकऱ्यांमध्ये होणारी आगळीवेगळी पैज बघण्यासाठी पंचक्रोशीतील नव्हे तर विदर्भातील हौसी मंडळी येतात. तयारी व सजावटीचे बैल, अशा दोन गटात ही स्पर्धा होते. तयारी गटासाठी शेतकऱ्यांमध्ये चांगलीच पैज लागते. यासाठी येथील शेतकरी लाखांवर खर्च करतात. ही प्रथा सिंदी रेल्वेच्या बैल पोळ्याची परंपरा झाली आहे.
तयारी गटासाठी बैलाची निवड करताना बैलाच्या शिंगापासून पायापर्यंत निरीक्षण केले जाते. बैलजोडी किती जाडी आहे. देखणी आहे, पायात सरळ आहे की नाही, किती वयोमर्यादा आहे याचीही पारख केली जाते. या गटात आपली बैलजोडी सरस ठरावी यासाठी साधारणत: दोन महिन्यांपूर्वीच शेतकरी एक ते दीड लाखापर्यंतची मुंगलाई बैलजोडी खरेदी करतो. ही बैलजोडी सजविण्यासाठी ५० ते ६० हजार रुपये खर्च येतोे. बैल जोडीचा रोजचा किमान खर्च ४०० रुपये असतो.
बैलजोडी तयार करण्यासाठी गुळ, मोह, तुरटी, आंबेहळद, शेंदे मीठ, लसुन या वस्तुचे मिश्रण करून एका मडक्यात १५ दिवस बंद करून ठेवले जाते. ते सडवून बैलजोडीला रोज १ लिटर पाणी करून प्यायला दिले जाते. बैल जोडीची पचनक्रिया व्यवस्थित राहून चारापाणी योग्य पध्दतीने व्हावे हा यामागचा हेतु. या बैलजोडी मागे शेतकऱ्याला दर महिन्यात १० ते १५ हजार रुपये तसेच बैलजोडीची काळजी घेण्यासाठी मजुराचा ७ हजार ५०० रुपये महिना असा २० हजार रुपयांचा खर्च येतो. पोळ्याचा दिवस जवळ आला की अंड्याचा डोजही वाढविला जातो. गावात अशा १५ ते २० बैलजोड्या तयार केल्या जातात.
हा पोळा नगर पालिकेच्यावतीने आयोजित केल्या जाते. तयारी गटात १५ ते २० व सजावट गटात १० ते १५ जोड्या असतात. पैकी प्रत्येकी २ गटातून ५-५ अशा १० जोड्या गौरविण्यात येते.