आमदार समीर कुणावार यांनी जाणून घेतल्या वर्ध्यातील संपकरी एसटी कर्मचा-यांच्या समस्या
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2017 03:07 PM2017-10-20T15:07:25+5:302017-10-20T15:07:41+5:30
गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचा-यांच्या समस्या आमदार समीर कुणावार यांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
हिंगणघाट (वर्धा ) - गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचा-यांच्या समस्या आमदार समीर कुणावार यांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. एसटी कर्मचा-यांच्या आंदोलन स्थळाला कुणावार यांनी भेट दिली व त्यांच्या समस्या शासनदरबारी मांडण्याचे आश्वासनही दिले. पदनिहाय वेतन श्रेणीसह सातव्या वेतन आयोगाचे मागणीकरीता संपूर्ण महाराष्ट्रात एस.टी. कर्मचा-यांनी पुकारलेल्या संपात हिंगणघाट आगाराचे ३६० कर्मचारी सहभागी झाले असून एकूण ६८ नियते व तब्बल ४२६ फे-या रद्द झालेल्या आहेत.
कुणावार यांनी १८ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता हिंगणघाट एस.टी. आगारातील संपकरी कर्मचा-यांच्या मंडपास भेट दिली. यावेळी पं.स. सभापतील गंगाधर कोल्हे, भाजपा जिल्हा चिटणीस प्रा. किरण वैद्य उपस्थित होते. कामगार संघटनेचे आगार सचिव हितेंद्र हेमके, महाराष्ट्र मोटर कामगार संघाचे यशवंत डाखोरे, इंटकचे बाळू मैंद यांना एसटी कामगाराच्या विविध मागण्या आमदारांना अवगत करून समस्या मांडल्या.
यावेळी आमदारांनी संपूर्ण मागण्यांचा आढावा घेवून गेल्या अनेक वर्षापासून कर्मचा-यांना तुटपुंज्या पगारावर उपजिविका करावी लागत असल्याचे मान्य करून त्यांचेवर अन्याय होत असल्याची कबुली यावेळी दिली. एस.टी. कर्मचा-यांच्या सर्व मागण्या या रास्तच असून त्यांच्या व्यथा शासनदरबारी मांडणार असल्याचे सांगितले. या आंदोलनाबाबात त्यांनी स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री या आंदोलनावर लवकरच सकारात्मक तोडगा काढतील, असाही आशावाद त्यांनी व्यक्त केला.
मेंदूची शस्त्रक्रियास झाल्याने भविष्यात काम करण्यास असमर्थ असणारे हिंगणघाट एस.टी. आगारातील चालक वावरे यांनी आ. कुणावार यांनी त्वरित पुढील उपचाराकरीता १५ हजाराची रोख मदत दिली. कुणावार यांनी एस.टी. कर्मचा-यांच्या आंदोलनाबाबत घेतलेल्या भूमिकेचे कर्मचा-यांनी समाधान व्यक्त करून लवकरच तोडगा निघेल, अशी आशा व्यक्त केली.