पांदण रस्त्याची समस्या निकाली निघणार
By admin | Published: April 19, 2017 12:45 AM2017-04-19T00:45:11+5:302017-04-19T00:45:11+5:30
जिल्ह्याला सी.एस.आर. निधीमधून दोन जे.सी.बी. यंत्र प्राप्त झाले आहे.
आमदारांचा पाठपुरावा : जलसंधारणाची कामेही होणार
हिंगणघाट : जिल्ह्याला सी.एस.आर. निधीमधून दोन जे.सी.बी. यंत्र प्राप्त झाले आहे. यामुळे जिल्ह्यातील जलसंधारणाची कामेही होणार आहे. पांदण रस्त्याची समस्या सोडविण्यासाठी आमदार समीर कुणावार यांच्या पाठपुरावा केला होता.
ग्रामीण भागात शेतकऱ्यांना आपल्या शेतात ये-जा करण्यासाठी तसेच शेतमालाची ने-आण करण्यासाठी पांदण रस्ता महत्त्वाचा आहे. परंतु, पांदण रस्ता बांधकामाकरिता मुबलक निधी उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. बहुतांश पांदण रस्त्यांना झुडपांसह अतिक्रमणाचा वेडा आहे. पांदण रस्त्याची कामे व्हावी, अशी शेतकऱ्यांची मागणी होती. तटपुज्या निधीत ही कामे करणे शक्य नव्हते. त्यामुळे आ. कुणावार यांनी पालकमंत्री तथा वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचेकडे प्रस्ताव सादर केला.
त्यात जिल्ह्यात किमान दोन जेसीबी मशीन दिल्यास त्याद्वारे पांदण रस्त्याची समस्या निकाली निघेल व जलसंधारणाची कामे सुद्धा होतील, अशा आशयाचा मजकुर होता. आ. कुणावार यांचा प्रस्ताव ना. मुनगंटीवार यांनी तातडीने मान्य करीत सी.एस.आर. निधीमधून दोन जेसीबी मशीन जिल्ह्याकरिता दिल्या आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील ही पहिलीच बाब आहे असल्याचे कळविण्यात आले आहे.
त्याची जबाबदारी तहसील कार्यालयावर सोपविण्यात आली असून पांदण रस्ते अतिक्रमण मुक्त व मोकळे करणे, त्यानंतर जलसंधारणाची व इतर कामे करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी वर्धा यांनी जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना दिले. त्या अनुषंगाने सोमवार दि. १७ एप्रिल पासून हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथून पांदण रस्त्याच्या कामाला सुरूवात करण्यात आली.
यावेळी तहसीलदार सचिन यादव, भाजपा तालुकाध्यक्ष आकाश पोहाणे, सरपंच प्रशांत घवघवे, ग्रा.पं. सदस्य प्रवीण फटींग, गिरधर चिडाम, प्रभाकर कांबळे, नाना ढगे, रवी टापरे, किशोर भागडे, तुराणे, दिवाकर वावरे, नारायण भिसे, संदीप झाडे, विठ्ठल गुजरकर, सुधाकर खैरे, प्रभाकर उगेमुगे, अमोल महाकाळकर, जनार्धन काचोरे, वाटकर, विळुरकर आदी उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)