थातूरमातूर डागडुजीमुळे वाट ठरतेय अडचणीची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 05:00 AM2020-06-16T05:00:00+5:302020-06-16T05:00:02+5:30
वर्ष-दीड वर्षापूर्वी भूमिगत गटार योजनेच्या कामाला मंजुरी मिळाली. याकरिता १०२ कोटी रुपये निधी मंजूर झाला. नगरपालिकेकडून नियोजनाच्या अभावात हे काम सुरू करण्यात आले. सुरुवातीपासूनच हे काम वादाच्या भोवऱ्यात सापडले. मलनिस्सारण वाहिनीकरिता अनेकांना घरी पूर्वीच असलेली सुस्थितीतील वाहिनी फोडावी लागली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : नगरपालिकेच्या वतीने मागील वर्षभरापासून शहरात सुरू असलेल्या भूमिगत गटार आणि अमृत योजनेने नागरिकांच्या अडचणीत चांगलीच भर घातली आहे. पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी थातूरमातूर डागडुजी केल्याने रस्तञयांवर चिखल असून अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. परिणामी, नागरिकांची वाट बिकट झाली आहे.
वर्ष-दीड वर्षापूर्वी भूमिगत गटार योजनेच्या कामाला मंजुरी मिळाली. याकरिता १०२ कोटी रुपये निधी मंजूर झाला. नगरपालिकेकडून नियोजनाच्या अभावात हे काम सुरू करण्यात आले. सुरुवातीपासूनच हे काम वादाच्या भोवऱ्यात सापडले. मलनिस्सारण वाहिनीकरिता अनेकांना घरी पूर्वीच असलेली सुस्थितीतील वाहिनी फोडावी लागली. यात नागरिकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागला. याला अनेक ठिकाणी विरोध होऊनही हे काम सुरूच ठेवण्यात आले. याकरिता सुस्थितीतील सिमेंट रस्तेदेखील फोडण्यात आले. कार्यारंभ आदेशात योजनेचे काम पूर्णत्वास गेल्यानंतर रस्त्यांची व्यवस्थित डागडुजी करण्याबाबत स्पष्ट उल्लेख आहे. मात्र, फोडकामानंतर नालीप्रमाणे खोदलेले खड्डे नीट बुजविण्यात आले नाही. यात कंत्राटदाराकडून कमालीचा हलगर्जीपणा करण्यात आला. कित्येक ठिकाणी रस्ते व्हायब्रेटरच्या सहाय्याने फोडण्यात आले. मात्र, अद्याप काम करण्यात आले नाही. लॉकडाऊनमुळे मागील तीन महिन्यांपासून सर्व काही ठप्प असल्याने हे बांधकामही सद्यस्थितीत रखडलेले आहे. लॉकडाऊनपूर्वी खोदकामाची थातूरमातूर डागडुजी केल्याने धंतोली, मालगुजारीपुरा, हवालदारपुरा, गोंड प्लॉट, साईनगर, प्रतापनगर व अन्य भागात रस्त्यावर पावसामुळे चिखलाचे साम्राज्य आहे. त्यामुळे नागरिकांना पावसाळ्याच्या दिवसांत मोठ्या अडचणींना सामना करावा लागत आहे. मात्र, पालिका प्रशासनाला नागरिकांच्या त्रासाशी काहीही देणे-घेणे नाही. योजनेचे काम अधांतरीच असताना ती यशस्वी ठरणार की नाही, नगर प्रशासनाने कोट्यवधींचा केलेला खर्चही व्यर्थ ठरेल का, असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत.
रेल्वेस्थानक मार्गावरील चेंबर खचले
भूमिगत गटार योजनेकरिता नालीप्रमाणे खोदकाम करून जलवाहिनी अंथरल्यानंतर सिमेंटचे चेंबर तयार करण्यात आले. बांधकामानंतर अल्पावधीतच चेंबरला अनेक ठिकाणी तडे गेले. तर रेल्वेस्थानक मार्गावरील चेंबर पूर्णत: खचले असून त्यातील सळाखी उघड्या पडल्या आहेत. मात्र, याकडे कुणाचेही लक्ष नाही. या योजनेची सखोल चौकशी करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.