दोन एकरांत घेतले तब्बल १८ क्विंटल सोयाबीनचे उत्पादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 09:21 AM2021-05-25T09:21:08+5:302021-05-25T09:22:00+5:30
Wardha news आर्वी तालुक्यातील दौलतपूर येथील युवा शेतकरी सुरेश वसंत कदम याने जानेवारीच्या ३१ तारखेला सोयाबीन लावले आणि केवळ दोन एकरांत सोयाबीनचे १८ क्विंटल उत्पादन घेतले.
वर्धा : मागील हंगामात नापिकी झाल्याने त्रस्त शेतकऱ्याने खचून न जात जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर दोन एकरात तब्बल १८ क्विंटल सोयाबीनचे उत्पादन घेतले असून, युवा शेतकऱ्याच्या शेतातील पीक पाहण्यासाठी कृषितज्ज्ञ अधिकारी आणि शेतकऱ्यांनी शेतीची पाहणी करीत भेट दिली.
उन्हाळी सोयाबीनचे उत्पन्न शेतकरी अल्प घेतात. कारण त्यात उत्पादन न होण्याची भीती असते. सर्व खर्च वाया जात असल्याने शेतकरी पावसाळ्यातच जून, जुलै महिन्यांत नगदी पीक म्हणून सोयाबीनचे उत्पन्न घेतात. मात्र, यावर्षी कापूस, सोयाबीन पिकाने शेतकऱ्यांची चांगलीच वाताहात केली होती. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला होता. आर्वी तालुक्यातील दौलतपूर येथील युवा शेतकरी सुरेश वसंत कदम याने जानेवारीच्या ३१ तारखेला सोयाबीन लावले आणि केवळ दोन एकरांत सोयाबीनचे १८ क्विंटल उत्पादन घेतले. परिसरात ही वार्ता वाऱ्यासारखी पसरताच परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी शेतीला भेट देत सोयाबीन पेरणीसाठी आम्हाला द्या, असा तगादा लावला.
सुरेश कदम असे यांची दौलतपूर शिवारात सहा एकर शेती आहे. त्यात त्यांनी उन्हाळी सोयाबीन लावले होते. त्यापूर्वी कापूस आणि सोयाबीन पिकाने दगा दिल्याने या शेतकऱ्याचा खर्चही निघाला नव्हता त्यामुळे ते चिंताग्रस्त होते. अखेर त्यांनी उन्हाळी सोयाबीन पीक घेण्याचा निर्णय घेतला. शेतातील पऱ्हाटी उपटून शेत स्वच्छ केले. दोन एकरांत गायत्री सीड्स आणि चार एकरांत दोन पुन्हा वेगवेगळ्या सोयाबीन व्हरायटीची पेरणी केली. यासाठी त्यांना एकरी दहा हजारांचा खर्च आला. मात्र चार एकरांत किडीचा प्रादुर्भाव झाल्याने सोयाबीन गेले. परंतु दोन एकरांत चांगले सोयाबीन झाल्याने त्यांना तारले.
सहा एकर सोयाबीनचे तीन प्लॉट लावले. तीन वेगवेगळ्या कंपनीचे सोयाबीन लावले. स्प्रिंकलरने त्यांना सातवेळा पाणी दिले. चारवेळा रासायनिक खते व फवारणी केली. कृषितज्ज्ञांनी पाहणी करून मार्गदर्शन केले.
गायत्री २०१९ आणि २०३४ या सोयाबीनने दोन एकरांत १८ क्विंटल उत्पादन दिले, उर्वरित चार एकरांत चार क्विंटल सोयाबीन झाले आहे. हे सोयाबीन बाजारात न विकता परिसरातील शेतकऱ्यांना मागणीप्रमाणे बियाणासाठी देणार आहे.
सुरेश वसंत कदम, युवा शेतकरी, देऊरवाडा
............................