वर्धा जिल्ह्यातील लोणीच्या १४ महिलांनी सुरू केले बल्बचे उत्पादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 02:02 PM2018-03-10T14:02:48+5:302018-03-10T14:03:07+5:30
केवळ एका महिन्यात दोन लाख रुपये किमतीच्या उत्पादनाची विक्री करून नवा विक्रम प्रस्थापित करतात. ही किमया वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील लोणी या केवळ ११०० लोकवस्ती असलेल्या गावातील महिलांनी करून दाखविली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल २२ महिला बचत गटातील महिला एकत्र येतात. उद्योगाचा पाया रचतात. आकलनाबाहेर असलेल्या क्षेत्रात निर्मिती उद्योग उभारतात आणि
गावातील या महिलांची मेहनत आणि महाराष्ट्र ग्रामीण सामाजिक परिवर्तन अभियानचे पाठबळ यामुळे हे शक्य होऊ शकले. याच महत्त्वकांक्षी महिलांची ही यशोगाथा.
लोणी या गावात प्रिया सुनारकर आणि शुभांगी कोल्हे यांच्या नेतृत्वातील प्रज्ञा ग्रामसंघ आणि आशा ग्रामसंघ स्थापन केला. एका ग्रामसंघात ११ महिला बचत गटांचा समावेश असतो. या दोन्ही ग्रामसंघांनी एकत्र येऊन प्रज्ञाशा महिला उद्योगिनी संघाची स्थापना केली. २२ महिला बचत गटातील १४ निवडक महिलांचा समावेश असलेल्या या उद्योगिनी संघाला महाराष्ट्र ग्रामीण सामाजिक परिवर्तन अभियानचे ग्रामपरिवर्तक अतुल राऊत यांनी दिशा दाखविली. उद्योग सुरू करणाच्या उद्देशाने स्थापन झालेल्या या संघाने निर्मितीक्षेत्रात पाऊल ठेवण्याचे ठरविले. आता उद्योगाच्या दिशेने संघाचा प्रवास सुरू झाला.
प्रज्ञाशा महिला उद्योगिनी संघाच्या बैठकीत एलईडी बल्ब निर्मितीचा उद्योग सुरू करण्याचे ठरले. सर्व महिलांनी मिळून ९० हजार रुपये प्राथमिक रक्कम उभी केली. महाराष्ट्र ग्रामीण सामाजिक परिवर्तन अभियानाच्या निधीतून त्यांना ७० हजार रुपयांचा निधी देण्यात आला. यातून एलईडी बल्ब निर्मितीचा व्यवसाय सुरू झाला आणि दीड महिन्यातच ३५ हजारांच्या नफ्यासह उद्योगाने भरारी घेतली.
दीड महिन्यांत ३५ हजारांचा नफा
एक लाख ६० हजारांच्या गुंतवणुकीतून सुरू झालेल्या या व्यवसायाच्या माध्यमातून महिलांनी एक लाख ८५ हजारांच्या एलईडी बल्बची विक्री केली. आता सुमारे एक हजार बल्ब विक्रीसाठी उपलब्ध आहेत. १२ स्ट्रीट एलईडी लाईटचीही निर्मिती केली. त्यांची विक्री झाली. जिल्हाधिकारी कार्यालतातर्फे तयार करण्यात आलेल्या रुरल मॉलला १ लाख २० हजार रुपयांच्या, उमेद वस्तू विक्री केंद्राला २५ हजारांच्या, दोन ग्रामपंचायतींना ३० हजारांच्या तर स्थानिक बाजारात २० हजार रुपयांच्या बल्बची विक्री प्रज्ञाशा संघाने केली असून त्यातून ३५ हजारांचा निव्वळ नफा कमावला.
काय आहे महाराष्ट्र व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाऊंडेशन
महाराष्ट्रातील विविध कॉपोर्रेट कंपन्यांच्या सहकार्याने सीएसआर फंडातून ग्रामीण महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी सुरू केलेले अभियान म्हणजेच महाराष्ट्र व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाऊंडेशन. या माध्यमातून महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यातील एक हजार गावांची निवड करण्यात आली आहे. एका ग्रामपंचायतीमागे एक मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तक नेमण्यात आला असून फाऊंडेशन आणि गावकरी यांच्यामधील सेतूचे कार्य तो करीत आहे. त्यांच्या सामाजिक विकासासाठी आवश्यक त्या योजना फाऊंडेशनच्या माध्यमातून गावात राबविण्यात येत आहेत.
महाराष्ट्र व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाऊंडेशन ग्रामीण महाराष्ट्राच्या सामाजिक विकासासाठी कटिबद्ध आहे. निवड करण्यात आलेल्या गावात शैक्षणिक विकास, जलसमृद्धी, पर्यावरण सुरक्षा, शेतीविकास, आरोग्य सुरक्षा, डिजीटल कनेक्टिव्हिटी आदींवर भर देण्यात येत आहे. सुमारे १५० ग्रामपरिवर्तक (मुख्यमंत्री मित्र) यासाठी रात्रंदिवस गावकऱ्यांमध्ये मिसळून काम करीत आहे. अनेक गावात काही महिन्यातच सकारात्मक बदल दिसत असून ग्रामपरिवर्तनाची ही नांदी आहे.
- रामनाथ सुब्रमण्यम,
सीईओ, महाराष्ट्र व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाऊंडेशन