सुरक्षित फवारणीसाठी अंगरक्षक कोटाची निर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 01:18 AM2017-12-22T01:18:19+5:302017-12-22T01:18:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शेतकऱ्यांकडून रासायनिक कीटकनाशकांचा अविवेकी वापर होत आहे. सतत फवारणीच्या कामामुळे मानवी शरीरावर दुष्परिणाम होत आहे. विदर्भात झालेल्या जीवितहानीमुळे सर्व शेतकºयांत एक भयावह वातावरण निर्माण झाले आहे. या हानीची दक्षता घेण्याकरिता डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलांतर्गत येणाऱ्या सेलसुरा येथील कृषी विज्ञान केंद्राद्वारे गोणींपासून पोषाख तयार करण्यात आला.
कृषी विज्ञान केंद्र सेलसुरा येथील गृहविज्ञान विषयतज्ञ प्रा. उज्वला सिरसाट यांनी वसंतराव नार्ईक मराठरावाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे अंगरक्षक कोटाची प्रात्यक्षिकासह माहिती घेतली. यानंतर अंगरक्षक कोट तयार केले आहेत. काही शेतमजूर सतत फवारणीची कामे करीत असल्याने त्यांच्यावर घातक परिणाम होत आहेत. सतत किटकनाशकाच्या संपर्कामुळे त्वचेची अॅलर्जी, खाज, सतत डोकेदुखी, अशक्तपणा, मळमळ, चक्कर येणे, दृष्टी कमी होणे आदी लक्षणे दिसून येतात. फवारणी कररताना द्रावण अंगावर, डोळ्यात व श्वासाद्वारे नाकात जाते. फवारणीच्या वेळी तंबाखू खाणे, विडी ओढणे, हात न धुता पाणी पिणे आदी प्रकार सर्रास आढळतात. यामुळे किटकनाशकांचे अंश पोटात जाऊन मृत्यूही ओढवू शकतो. ही जीवहानी होऊ नये या दृष्टीकोनातून सेलसुरा येथील कृषी विज्ञान केंद्रामध्ये किटकनाशक फवारणी अंगरक्षक कोट (कपडे) तयार केलेले आहे. यात बूट, हातमोजे, मास्क चेहरा झाकण्यासाठी प्लॉस्टिकचे आवरण, टोपी आदी घालून संरक्षित फवारणी करता येते. या पोशाखाला आतून सुती कापडाचे अस्तर लावलेले आहे. हा पोशाख घरीही तयार केला जाऊ शकतो. सुती कापडाचे अस्तर लावल्यास येणारा घाम सोशला जातो तथा कापडे असल्याने किटकनाशकाचे कण आत जाऊ शकणार नाही. याची किंमत सुमारे ३५० रुपयांपर्यंत जात असून बचत गटांमार्फत असे पोशाख अधिक प्रमाणात तयार करून शेतकºयांना ते स्वस्त दरात उपलब्ध केले जाऊ शकतात. यातून बचत गटांनाही रोजगार मिळेल आणि शेतकºयांनाही कमी खर्चात उपयोगी वस्तू प्राप्त होऊ शकेल. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या अंगरक्षक कोटाचे प्रात्याक्षिकही देण्यात आले आहे.
हात पाण्याने स्वच्छ धुवावे, किटकनाशकाचा पर्यावरणाशी कमीत कमी संपर्क येईल याची काळजी घ्यावी. किटकनाशके फवारलेल्या शेतात इशारा फलक लावावा आदी काळजी घेण्याच्या सूचनाही कार्यक्रम समन्वयक डॉ. प्रशांत उंबरकर यांनी दिल्या. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कृषी विज्ञान केंद्र सेलसूरा येथे भेट देत अंगरक्षक कोटाची पाहणी करावी. किटकनाशक फवारताना घ्यावयाच्या काळजीबद्दल माहिती घ्यावी, असे आवाहन शास्त्रज्ञांनी केले आहे.
कृषी यांत्रिकीकरणावर चर्चासत्र व यंत्राचे प्रात्यक्षिक
आंजी (मो.)- येथील शेतकरी गट व चंद्रशेखर अॅग्रो इंजिनिअरींग सिंदी (रेल्वे) यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीकृष्ण गो-आश्रम येथे कृषी यांत्रिकीकरणावर चर्चासत्र व यंत्राचे प्रात्याक्षिक पार पडले. यावेळी गजानन ढुमणे, अनिल पाटील, प्रमोद भोयर मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. मान्यवरांनी शेतकऱ्यांना तांत्रिक शेती करण्यासाठी कृषी यंत्र, अवजारे चांगले वापरून कमी वेळेत जास्त कामे कशी करता येतील. खर्चही कमी लागेल व चांगले उत्पन्न होऊन बचत होईल, याबाबत मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्रवीण खैरकार यांनी, संचालन हरिष राऊत यांनी केले तर आभार रणजीत ताकसांडे यांनी केले. कार्यक्रमाला प्रमोद भोमले, मनोहर शिंदे, बावणकर, हिंगे आदींनी सहकार्य केले.