हिंगणघाटमध्ये झिरो बजेट चित्रपटाची निर्मिती
By Admin | Published: August 28, 2016 12:34 AM2016-08-28T00:34:06+5:302016-08-28T00:34:06+5:30
मोबाईलच्या सहाय्याने केवळ ३ हजार रुपयांत ५० मिनिटांचा व्यावसायिक लघु चित्रपट बनविण्याचा निर्धार स्थानिक कलावंतांनी पूर्ण केला आहे.
कलावंताचा अनोखा प्रयोग : केवळ मोबाईलद्वारे चित्रीकरण
हेमंत चंदनखेडे हिंगणघाट
मोबाईलच्या सहाय्याने केवळ ३ हजार रुपयांत ५० मिनिटांचा व्यावसायिक लघु चित्रपट बनविण्याचा निर्धार स्थानिक कलावंतांनी पूर्ण केला आहे. ‘अॅक्युलस द वे आॅफ लुकींग’ (पाहण्याचा बदललेला दृष्टीकोन) असे या चित्रपटाचे नाव असून त्याच्या प्रिमिअर शोला हिंगणघाटकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
येथील एका चित्रपटगृहात नुकताच हा सिनेमा प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटातील एक नायिका वगळता सर्व कलावंत हिंगणघाटच्याच मातीतले आहेत. विशेष म्हणजे चित्रपटासाठी हे सर्वच कलाकार नवखे आहेत. हा अख्खा चित्रपट मोबाईलच्या सहाय्याने चित्रित करण्यात आला आहे. केवळ २० दिवसांत हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. विना मानधन तत्वावर सदर चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. स्वत:च निर्माता, निर्देशक, लेखक असलेले स्थानिक कलावंत इंद्रजीत आणि त्यांचा मुलगा केतन तायवाडे यांनी मिळून चित्रपटाची निर्मिती केली आहे.
निर्माता निर्देशक असलेले इंद्रजीत तायवाडे हे रंगमंचावरील जुने कलाकार आहेत. आपण एखादा चित्रपट तयार करण्याची त्यांची इच्छा होती. याकरिता लागणारे कुठलेही भागभांडवल त्यांच्याकडे नव्हते; परंतु दुर्दम्य विश्वास आणि मुलगा केतनच्या साथीच्या जोरावर त्यांनी सदर चित्रपट केवल मोबाईलच्या मदतीने पूर्ण केला. विशेष म्हणजे चित्रपटाच्या तांत्रिक बाबीही त्यांनी मोबाईलवरूनच पूर्ण केल्या. त्यामुळे चित्रपटाचा प्रिमियर शो पाहताना स्वत:वरच विश्वास बसत नसल्याचे तायवाडे यांनी सांगितले. या चित्रपटाची नायिका रूची जांभुळे ही भंडारा येथील असून इतर सर्वच कलावंत हिंगणघाट परिसरातील आहेत. चित्रपटातील तिचे नाव ‘राणी’ असून तिच्याभोवतीच कथानक फिरते. स्थानिक कलावंत विकी आगरकर (चित्रपटातील नाव- छोटा पाटील) याने खलनायकाची भूमिका साकारली आहे. आईची भूमिका शिवाणी घोडे यांनी साकारली आहे.
संपूर्ण चित्रपट हा हिंगणघाट परिसरातच बसस्थानक, उड्डाण पुल, जुनी वस्ती या भागात चित्रित करण्यात आला आहे. हिंगणघाटच्या कलावंतांनी तिथल्याच मातीत बनविलेला हा चित्रपट पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी झाली होती. निर्मितीसाठी या दोघांना अभिजित आणि सुशिल घोडे यांनी सहकार्य केले. प्रिमियर शोला माजी आमदार राजू तिमांडे, मनसे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले, उपाध्यक्ष अमोल बोरकर, मनविसेचे राहुल सोरटे, गिमाटेक्सचे फॅक्टरी मॅनेजर शाकीर खान पठान, आपचे मनोज रूपारेल आदींसह नागरिकांची उपस्थिती होती.