प्राध्यापक निलंबन प्रकरणाचे पडसाद, हिंदी विश्वविद्यालयात तणाव; कुलगुरुंच्या वाहनाला विद्यार्थ्यांचा घेराव
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2023 01:55 PM2023-08-10T13:55:26+5:302023-08-10T13:56:56+5:30
पोलिसांची मोठी कुमक झाली होती दाखल
वर्धा : महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाची प्रतिमा मलीन करणाऱ्यांच्या चौकशीची मागणी करणारे शिक्षक संघाचे अध्यक्ष डॉ. धर्वेश कथेरिया यांना ८ रोजी निलंबित करण्यात आल्याने याचे तीव्र पडसाद बुधवारी ९ रोजी हिंदी विश्वविद्यापीठात उमटले. विद्यार्थ्यांनी निलंबन मागे घेण्याची मागणी करीत कुलगुरु शुक्ल यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करुन त्यांच्या वाहनाला घेराव घातला. पोलिसांनी तणाव दूर करीत कुलगुरुंना पोलिस बंदोबस्तात विद्यापीठाबाहेर पाठविले.
हिंदी विद्यापीठाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याशी संबंधित आक्षेपार्ह मुद्द्यांवर सोशल मीडियावर मेसेज व्हायरल केले जात होते. या प्रकरणाची विद्यापीठ प्रशासनाकडे चौकशी करण्याची मागणी जनसंवाद विभागाचे सहयोगी प्राध्यापक व शिक्षक संघाचे अध्यक्ष डॉ. कथेरिया यांनी केली होती. याची सत्यता पडताळून पाहण्यासाठी त्यांनी रामनगर तसेच सायबर पोलिस ठाण्यातही तक्रार दिली होती. या सर्व प्रकारामुळे डॉ. कथेरिया यांना कुलसचिव कादर नवाज यांनी निलंबित केले. त्यांनी याबाबत विद्यापीठ प्रशासनाची परवानगी न घेतल्याचा आरोप करण्यात आला. याचे पडसाद हिंदी विद्यापीठात उमटले असून, बुधवारी सकाळपासूनच विद्यार्थ्यांनी कुलगुरुंच्या कक्षासमोर डॉ. कथेरिया यांच्या समर्थनार्थ निलंबन मागे घेण्याची मागणी करीत ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.
पोलिस बंदोबस्तात कुलगुरु पडले विद्यापीठाबाहेर
कुलगुरु प्राे. रजनिशकुमार शुक्ल यांच्या कक्षासमोरच विद्यार्थी आंदोलनाला बसले होते. त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरु असल्याने पोलिसांची कुमक बोलाविण्यात आली होती. अखेर पोलिस बंदोबस्तात कुलगुरु शुक्ल कारमध्ये बसून विद्यापीठाबाहेर गेले.
परिसरात तणाव अन् पोलिस बल तैनात
विद्यापीठ परिसरात आंदोलनकर्त्यांकडून कुलगुरु शुक्ल यांच्याविरोधात नारेबाजी करण्यात येत होती. यामुळे गोंधळ उडून तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. अखेर अपर पोलिस अधीक्षक डॉ. सागर कवडे, पोलिस निरीक्षक धनाजी जळक, महेश चव्हाण, कैलास पुंडकर, चंद्रशेखर चकाटे हे कर्मचाऱ्यांसह विद्यापीठात दाखल झाले. दरम्यान एसआरपी प्लाटून देखील पाचारण करण्यात आली होती.
कुलगुरुंच्या समर्थनार्थ दिल्या घोषणा
हिंदी विद्यापीठात मागील काही दिवसांपासून तणाव सुरु आहे. कुलगुरुंच्या निषेधार्थ आंदोलने सुरु आहेत. अशातच बुधवारी दुपारच्या सुमारास विद्यार्थ्यांचा एक गट कुलगुरुंच्या समर्थनार्थ घोषणाबाजी तर दुसरा गट विरोधात घोषणा करताना दिसून आला.