ठिकठिकाणी मातोश्री रमाबाई आंबेडकर जयंतीनिमित्त कार्यक्रम
By Admin | Published: February 9, 2017 12:50 AM2017-02-09T00:50:09+5:302017-02-09T00:50:09+5:30
जिल्ह्यातील विविध ठिकाणी मातोश्री रमाबाई आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.
वर्धा : जिल्ह्यातील विविध ठिकाणी मातोश्री रमाबाई आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी विविध कार्यक्रमांतून अभिवादन करण्यात आले.
महाकोशल बौद्ध पंच कमिटी
वर्धा : महाकोशल बौद्ध पंच कमिटी हावरे ले-आऊट सेवाग्रामच्यावतीने बुद्ध विहाराच्या प्रांगणात मातोश्री रमाबाई भीमराव आंबेडकर यांची १२० वी जयंती कमिटीचे अध्यक्ष रमेश येसंबरे यांच्या अध्यक्षतेत साजरी करण्यात आली. समाजातील प्रत्येक महिलांनी रमाबाईचा आदर्श ठेवून जगले पाहिजे, असे येसंबरे यांनी सांगितले. प्रास्ताविक सिद्धार्थ शंभरकर यांनी केले. संचालन सूरज गणवीर यांनी केले तर आभार रजनीश फुलझेले यांनी मानले. कार्यक्रमाला प्रकाश येसनकार, प्रवीण नारायणे, धर्मपाल धनवीज, संजय जवादे, राहुल शेंडे, गुलाब सातपुडके, सुरेश नाईक, सुखदेव डोंगरे, रमेश कांबळे, चंद्रमणी जवादे, यशोधरा महिला मंडळाच्या शिलवंती गणवीर, रंजना येसंबरे, अर्चना येसनकार, प्रतिभा शंभरकर, आचल जवादे, प्राची येसनकार, प्रशिका शंभरकर, तन्वी गणवीर, भाग्यश्री शेंडे, कांचन कांबळे, शोभा बन्सोड, कुसूम डोंगरे, शालिनी व पार्वती ताकसांडे, शोभा सातपुडके, धनविज आदींनी सहकार्य केले.
विदर्भ ग्रामीण विकास सार्वजनिक ग्रंथालय
वर्धा : माता रमाबाई आंबेडकर यांची १२० वी जयंती कार्यक्रम व संत गाडगे महाराजांच्या तैलचित्राचे अनावरण कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी सहायक संचालक, माहिती व प्रसिद्ध विभाग मंत्रालय मुंबईचे संजय ओरके होते. त्यांनी माता रमाई व संत गाडगेबाबा यांच्या तैलचित्राचे पूजन व दीप प्रज्वलन केले.
कार्यक्रमाला प्रमुख वक्ते मिलिंद जुनगडे उपस्थित होते. त्यांनी माता रमाबाईचे जीवन चरित्र व्यक्त केले. माता रमाईचा जन्म ७ फेब्रुवारी १८९७ रोजी वणंद या गावी रत्नागिरी जिल्ह्यात अत्यंत गरीब वलंगकर कुटुंबात झाला. त्या त्यागी मातेचे लग्न अवघ्या ९ वर्षात झाले. भीमराव आंबेडकरांची परिस्थिती प्रतिकूल असताना व ते शिक्षण घेत असताना माता रमाईने आक्रोश करायला लावणारे दु:ख, लाचारी, गरीबी, आर्थिक संकटावर मोठ्या धैर्याने मात करून ताठ मानेने पती भीमरावाचा बॅरिस्टर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर घडविला.
शिकलेला व विचारवंत पती आपल्याला मिळाला याचा माता रमाईला अभिमान वाटत असे. माता रमाईचे धैर्य त्याग बलिदान पाहून कोल्हापूरचे राजे शाहू महाराजही भारावून गेले होते. त्यांनी माता रमाईला धाकटी बहीण मानले होते. त्यांचा त्याग सहनशीलता व कारूण्य किती असामान्य होते, याची प्रचिती येते, असे सांगितले. संचालन नामेश गुजर यांनी केले तर आभार राजेश धवने यांनी मानले.(कार्यालय प्रतिनिधी)