सॅनिटरी नॅपकीन निर्मितीतून महिलांनी साधली प्रगती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 10:32 PM2018-10-11T22:32:26+5:302018-10-11T22:33:03+5:30

उघडपणे चर्चा न करता येणारा महिलांच्या मासिक पाळीचा विषय आणि त्यांची कुचंबणा पॅडमॅन चित्रपटामुळे सर्वांसमोर आली. आता या विषयावर पुरुष सुध्दा महिलांच्या आरोग्यविषयक जनजागृतीसाठी पुढे येत आहेत. भारतात या उद्योगाला पोषक वातावरण तयार होत आहे याचा वेध घेत आष्टी तालुक्यातील महिलांनी सॅनिटरी नॅपकिनच्या निर्मितीतून स्वयंरोजगार उभारला आहे.

The progress made by women by the creation of sanitary napkins | सॅनिटरी नॅपकीन निर्मितीतून महिलांनी साधली प्रगती

सॅनिटरी नॅपकीन निर्मितीतून महिलांनी साधली प्रगती

Next
ठळक मुद्देउद्योगाची वाट धरत घेतली गगण भरारी : ‘पॅडमॅन’ मुळे बचत गटाला मिळाली प्रेरणा

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : उघडपणे चर्चा न करता येणारा महिलांच्या मासिक पाळीचा विषय आणि त्यांची कुचंबणा पॅडमॅन चित्रपटामुळे सर्वांसमोर आली. आता या विषयावर पुरुष सुध्दा महिलांच्या आरोग्यविषयक जनजागृतीसाठी पुढे येत आहेत. भारतात या उद्योगाला पोषक वातावरण तयार होत आहे याचा वेध घेत आष्टी तालुक्यातील महिलांनी सॅनिटरी नॅपकिनच्या निर्मितीतून स्वयंरोजगार उभारला आहे. मुख्य म्हणजे कोणत्याही आंतरराष्ट्रीय कंपनीला मागे टाकतील इतके दर्जेदार नॅपकीन या महिलांनी तयार केलेत.
ओम स्वयं सहाय्यता बचत गटाच्या महिलांची ही गगन भरारी चेतन कडू या पॅडमॅनमुळे शक्य झाली. कॉमन सर्व्हिस सेंटर चालविणाऱ्या चेतन कडू यांना कॉमन सर्व्हिस सेंटर कडून अशा पद्धतीच्या उद्योगासाठी प्रस्ताव मागितला. पहिल्यांदा पत्नीला याविषयी विचारले. कुटुंबीयांचा पाठिंबा मिळाला तर बचत गटाच्या महिलांसोबत हा व्यवसाय सुरू करू शकते असे पत्नी अपर्णाने सांगितले. त्यानंतर ओम स्वयं सहाय्यता बचत गटातील महिलांनी सुद्धा यासाठी तयारी दर्शविली. मनाची तयारी असली तरी पैशांची अडचण होतीच. जिजामाता पतसंस्था या महिलांच्या मदतीला धावून आली. गटातील धनश्री देशमुख, मंजुश्री काळे, अपर्णा कडू, संध्या काळे, वर्षा देशमुख, रफाक काझी या ६ महिलांनी प्रत्येकी ५० हजार रुपयांचे कर्ज काढले. नॅपकीन बनविण्यासाठी महिलांना प्रशिक्षण देण्यात आले.उद्योगाची उभारणी करुन ३० जूनला जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या हस्ते या उद्योगाचा श्रीगणेशा केला.

ट्रायल अँड फेल
महिलांनी पहिल्यांदा तयार केलेले नॅपकीन शाळेतील मुलींना मोफत वाटले. ‘अस्मिता’ या प्रकल्पासाठी त्यांनी या नॅपकीनचा पुरवठा केला. पण दुसºयांदा पुन्हा शाळेतील मुलींना नॅपकीन देण्यासाठी त्या गेल्या असता त्यांना मुलींनी नॅपकीन घेण्यास नकार दिला. कारण त्याची गुणवत्ता चांगली नाही, असे मुलींनी सांगितले. महिलांसाठी हा धक्का होता. महिला हे ऐकून नाराज न होता त्यांचा ट्रायल अँड फेल चा प्रयोग सुरू झाला. ६३ कंपन्यांचा सर्व्हे आणि त्यातल्या काही कंपन्यांना प्रत्यक्ष भेट देऊन नॅपकीनच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न सुरू झालेत. राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय बाजारातील कंपण्याच्या स्पर्धेत टिकायचे असेल तर त्यांच्यापेक्षा उत्तम दर्जाचे उत्पादन बनविण्यावर त्यांनी भर दिला.
‘पॅड मॅन’ चेतनचा पुढाकार
महिलांना हा व्यवसाय करण्यासाठी अपर्णा कडू यांचे पती चेतन कडू यांनी प्रोत्साहन देण्यासोबतच नॅपकीनच्या गुणवत्तेसाठी संशोधन करण्यात पुढाकार घेतला. अनेक कंपन्यांच्या प्रकल्पाला भेट दिली. त्याचबरोबर विविध कंपन्यांचे नॅपकीन विकत घेतलेत. हे करतेवेळी अनेकांनी त्यांची कुत्सितपणे खिल्ली उडवली. पण ते महिलांसोबत खंबीरपणे उभे राहिलेत. आज या पॅडमॅनमुळे महिलांनी वेगळ्या व्यवसायाची वाट धरली आहे.
स्वच्छ आणि सिक्युअर
दोन महिन्यांच्या ट्रायल आणि फेल नंतर उत्तम दजार्चे ‘स्वच्छ -सिक्युअर’ हे नवीन नाव आणि रूप घेऊन हे नॅपकीन बाजारात दाखल झाले. यामध्ये महिलांची जिद्द, मेहनत आणि हार न मानण्याची क्षमता यांचा चांगलाच कस लागला. तरीही मार्केटींगचा प्रश्न होताच. इतर उत्पादनांच्या तुलनेत आपले उत्पादन चांगले आहे, हे पहिल्यांदा पटवून देण्यासाठी महिलांनी आष्टीतील सर्व मेडिकल स्टोअर मध्ये जाऊन सदर नॅपकिन अतिशय कमी किमतीत उपलब्ध करून दिलेत. आज त्यांच्या नॅपकीनला चांगली मागणी आहे. मुख्य म्हणजे आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या तुलनेत अतिशय स्वच्छ आणि सिक्युअर तर आहेच पण हे पर्यावरण पूरक आहे. जमिनीत गाडल्यावर काही दिवसात त्याचे मातीत रूपांतर होते. केवळ २ महिन्यात महिलांनी २ लाख रुपयांचा व्यवसाय केला असून सध्या त्यांच्याकडे १ लाख नॅपकीनची आॅर्डर आहे.

Web Title: The progress made by women by the creation of sanitary napkins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.