‘त्या’ घटनेचा वर्धेत निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2018 11:12 PM2018-12-09T23:12:41+5:302018-12-09T23:13:51+5:30
रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आ.) गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्यावर करण्यात आलेल्या भ्याड हल्ला निंदनीय आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आ.) गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्यावर करण्यात आलेल्या भ्याड हल्ला निंदनीय आहे. त्याचा आम्ही निषेध करीत असल्याचे म्हणत स्थानिक जिल्हा कचेरीसमोर आरपीआय (आ) गटाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी रविवारी टायर जाळून रोष व्यक्त केला.
ना. आठवले यांच्यावर करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्यांनी रेटली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र आलेल्या आरपीआयच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी सुरूवातीला घोषणाबाजी केली. त्यानंतर रस्त्यावर टायर जाळून सदर घटनेचा निषेध नोंदविला. या आंदोलनाचे नेतृत्त्व जि.प. सदस्य विजय आगलावे यांनी केले. आंदोलनात वसंत भगत, दिलीप सुखदेवे, प्रकाश पाटील, अजय मेहरा, देविदास भगत, सुभाष सहांदे, देवानंद तेलतुंबडे, धम्मा शंभरकर, सतीश इंगळे, संजय वर्मा, विजय नगराळे, मोहन वनकर, संजय गवई, विनोद वाघे, सुरेंद्र पुनवटकर, संजय नगराळे, गौतम सबाने, अशोक मेश्राम यांच्यासह आरपीआयचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
वर्धा बंदचे आवाहन
आरपीआय (आ.) गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवार १० डिसेंबरला आरपीआयच्यावतीने वर्धा बंदचे आवाहन करण्यात आले आहे. या आंदोलनात व्यापाऱ्यांसह वर्धेकरांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जि.प. सदस्य विजय आगलावे यांनी केले आहे.