परिवर्तनवादी संघटनांद्वारे गौरी लंकेश यांच्या हत्येचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 12:39 AM2017-09-08T00:39:44+5:302017-09-08T00:40:11+5:30
शहरातील विविध परिवर्तनवादी संस्था, संघटनांच्यावतीने गुरूवारी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व विवेकवादी लिखाण करणाºया कर्नाटक राज्यातील पत्रकार व लंकेश पत्रिकेच्या संपादिका गौरी लंकेश यांच्या हत्येचा निषेध नोंदविण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहरातील विविध परिवर्तनवादी संस्था, संघटनांच्यावतीने गुरूवारी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व विवेकवादी लिखाण करणाºया कर्नाटक राज्यातील पत्रकार व लंकेश पत्रिकेच्या संपादिका गौरी लंकेश यांच्या हत्येचा निषेध नोंदविण्यात आला. यासाठी महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ निदर्शने करून पंतप्रधान यांना निवासी जिल्हाधिकारी जोशी यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले.
कर्नाटक राज्यातील पत्रकार व लंकेश पत्रिकेच्या संपादिका गौरी लंकेश यांची कडव्या हिंदुत्ववादी अविवेकी विचारसरणी असलेल्या मारेकºयांनी राहत्या घराच्या प्रांगणात गोळ्या झाडून हत्या केली. विवेकाने विचार करून कृती करा, असे सांगणारे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोळकर, खरा शिवाजी कोण होता, हे सांगणारे कॉम्रेड डॉ. गोविंद पानसरे तर संत बसवेश्वरांचे खरे साहित्य समाजासमोर आणणारे तथा मी हिंदु नाही लिंगायत आहे, हे सांगणारे प्रा. एम.एम. कलबुर्गी कनार्टक यांची हत्या कडव्या हिंदुत्ववादी विचारसरणी असलेल्या मारेकºयांनी केली. यात सनातन संस्थेचे साधकही सहभागी आहेत. त्यांची हिंमत वाढल्याने, प्रोत्साहन व संरक्षण मिळत असल्याने त्यांनी पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या करून हा धाक दाखविण्याचा प्रयत्न केला. तुम्ही जर सत्य सांगत असाल, खरा धर्म सांगत असाल तर तुमचाही दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश करू, असा इशारा दिला असल्याचे निवेदनात नमूद आहे. यावेळी महाराष्ट्र अंनिस, मार्च फॉर सायन्स ग्रुप वर्धा, आयटक, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, युवा सोशल फोरम, सेवाग्राम आश्रम, राष्ट्र सेवा दल, अ.भा. अंनिस, कामगार कृती संघटना, श्रमिक पत्रकार संघटना आदी संघटनेचे गजेंद्र सुरकार, हरिष इथापे, दिलीप उटाणे, गुणवंत डकरे, ओजस सु.व्ही., सुनील फरसोले, सुनील धिमे, सुधीर पांगुळ, ममता बालपांडे, अॅड. पूजा जाधव, वंदना कोळमकर, मैना उईके, किशोर देशपांडे आदी उपस्थित होते.
श्रमिक पत्रकार संघाचे निवेदन
वरिष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्यावरील हल्ला म्हणजे लोकशाहीच्या चवथ्या स्तंभावरील हल्ला होय. असे हल्ले लोकशाही व्यवस्थेला मागे खेचणारे आहे. याचा वर्धा श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने निषेध नोंदविण्यात आला. याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी मंगेश जोशी यांना निवेदनही देण्यात आले. यावेळी प्रवीण धोपटे, डॉ. प्रवीण वानखेडे, रमेश निमजे, रवींद्र लाखे, प्रवीण होणाडे, जमीर शेख, ढाले, इक्राम हुसेन, आशिष पावडे आदी उपस्थित होते.