आर्वीत चिनी वस्तूंची होळी करून नोंदविला निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 11:27 PM2017-08-29T23:27:48+5:302017-08-29T23:28:08+5:30
चीनच्या दंडूकेशाही धोरणांना प्रत्यूत्तर देण्याकरिता स्थानिक गांधी चौकात चिनी वस्तंूची होळी करून निषेध नोंदविण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : चीनच्या दंडूकेशाही धोरणांना प्रत्यूत्तर देण्याकरिता स्थानिक गांधी चौकात चिनी वस्तंूची होळी करून निषेध नोंदविण्यात आला. या आंदोलनात शेकडो महिला-पुरूषांसह विद्यार्थी सहभागी झाले होते.
या आंदोलनाचे नेतृत्त्व माजी खासदार विजय मुडे, माजी आमदार दादाराव केचे, मदत फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अनिल जोशी, अस्थीरोग तज्ज्ञ डॉ. रिप्पल राणे, नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे, राष्ट्रीय स्वदेशी सुरक्षा अभियान समितीचे अध्यक्ष अविनाश पंचगडे यांनी केले.
अनिल जोशी यांनी मार्गदर्शन करताना भारताच्या सीमा काबीज करण्यासाठी चीन प्रयत्न करीत आहे. दिवसेंदिवस चीनची दादागिरी वाढत आहे. चीन दोन्ही देशांच्या सिमेवर सैन्य पाठवून खुरापती कारवाया करीत आहे. त्याला प्रती उत्तर देण्यासाठी नागरिकांनी चिनी बनावटीच्या वस्तूची खरेदी करण्याला फाटा देत स्वदेशी वस्तूंची खरेदी करावी, असे आवाहन केले.
चिनी वस्तूंचा वापर करणे हे देश हिताचे नसून भारतीय बनावटीच्या मालाला प्रथम प्राधान्य देणे म्हणजेच देशहिताचे कार्य ठरणार आहे, असे याप्रसंगी नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे यांनी सांगितले.
स्वदेशी वस्तूंची खरेदी नागरिकांनी केल्यास देशातील बेरोजगारांना जास्तीत जास्त रोजगाराची संधी उपलब्ध होईल. त्यातूनच वाढत्या बेरोजगारीला आळा बसेल असेही त्यांनी सांगितले.
आंदोलनात राजाभाऊ गिरधर, दशरथ जाधव, सुनील पारसे, डॉ. विनय देशपांडे, सुशिलसिंह ठाकूर, विनय डोळे, पप्पू जोशी, नगरसेवक रामू राठी, जगण गाठे, कैलाश गळहाट, कमल कुलधरीया, श्याम काळे, परवेज साबीर, सतीश शिरभाते, सूर्यप्रकाश भट्टड, राजेश गुल्हाणे आदी सहभागी झाले होते. याप्रसंगी कन्नमवार विद्यालय, गांधी विद्यालय, मॉडेल हायस्कूल, विद्या निकेतन स्कूल, तपस्या स्कूलच्या विद्यार्थ्यांनी तथा शहरातील नागरिकांनी आपआपल्या घरातील चिनी बनावटीच्या वस्तू आणून त्याची होळी करून आपला रोष व्यक्त केला. तसेच केंद्र सरकारने चीनच्या विषयी कठोर भुमीका घ्यावी, अशी मागणी लावून धरली. कार्यक्रमाचे संचालन वसंत उपाध्ये यांनी केले तर दशरथ जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले.
सदर आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी मिलिंद हिवाळे, सुरेंद्र पारसे, हर्षल देशमुख, अभय हळवे, अजय कमकवार, हर्ष पांडे, गोपाल गहलोत, सागर निर्मळ, डवरे, मयूर पोकळे, अमोल घोटकर, संजय देशपांडे, नंदु वैद्य, अमोल मधुळकर, पायतोडे यांच्यासह विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.