दारूबंदीवरील आमदारांच्या भूमिकेचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 10:21 PM2017-12-26T22:21:30+5:302017-12-26T22:21:41+5:30
दारूबंदीच्या प्रभावी अंमलबजावणीकडे पोलीसही दुर्लक्ष होत असून याबाबत जिल्ह्यातील आमदार दारू खुली करण्याचे समर्थन करीत आहेत. हा प्रकार निंदनीय आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : दारूबंदीच्या प्रभावी अंमलबजावणीकडे पोलीसही दुर्लक्ष होत असून याबाबत जिल्ह्यातील आमदार दारू खुली करण्याचे समर्थन करीत आहेत. हा प्रकार निंदनीय आहे. त्याचा आम्ही निषेध करतो. पोलीस प्रशासनासह आमदारांना सद्बुद्धी मिळो व त्यांच्याकडून दारूबंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रयत्न व्हावे या मागणीसह सदर प्रकरणी योग्य कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी दारूबंदी महिला मंडळाने केली आहे.
तसे निवेदनही मंगळवारी उपजिल्हाधिकारी कदम यांना देण्यात आले आहे. पोलीस प्रशासनासह आमदारांना सद्बुद्धी मिळो व त्यांच्याकडून दारूबंदीच्या प्रभावी अंमलबजावणीकरिता प्रयत्न व्हावे, या मागणीसाठी गुरूवारी (२८ डिसेंबर) सेवाग्राम बापुकुटीतील यात्री निवासात दुपारी १२ वाजता आत्मचिंतन सभा आयोजित करण्यात आली आहे. प्रशासकीय अधिकाºयांनी दारूबंदीवर डोळेझाक केल्याचे चित्र आहे. प्रभावी अंमलबजावणीसाठी दारूबंदीच्या कायद्यात सुधारणा करणे गरजेचे आहे. नवीन पोलीस अधीक्षक आल्यापासून पाहिजे तशी दारूबंदीची अंमलबजावणी करण्यात आली नाही. दारूविक्रीमुळे गावातील शांतता भंग होत आहे. शिवाय गावात छोटे-मोठे तंटे होत आहेत. त्यातच आमदारांकडून वर्धा जिल्ह्यातून दारूबंदी हटविण्या संदर्भात समर्थन केले जात आहे. हा प्रकार जिल्ह्यात गुन्हेगारीला खतपाणी देणाराच आहे. या प्रकरणी दारूबंदी प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी असलेल्या पोलीस विभागाने व राज्य उत्पादन शुल्क विभागाने योग्य कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देताना विरांगणा दारूबंदी महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पा झाडे, बेबी गेडाम, इंदु कोकाटे, गोविंदा पेटकर, उमेश कांबळे, मंगेश शेंडे, भारती मसराम, गीता कुंभरे, निर्मला पाठक, अंजना सयाम, वनिता भवरे, कुंदा कुबडे आदी हजर होते.