भाजपा प्रदेशाध्यक्षांंच्या वक्तव्याचा निषेध
By admin | Published: May 13, 2017 01:13 AM2017-05-13T01:13:51+5:302017-05-13T01:13:51+5:30
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील यांनी जालना येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात शेतकऱ्यांना उद्देशून काही वादग्रस्त शब्दाचा वापर केला.
वर्धेत जिल्हा कचेरीसमोर धरणे तर आष्टीत जाळला दानवे यांचा प्रतिकात्मक पुतळा
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील यांनी जालना येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात शेतकऱ्यांना उद्देशून काही वादग्रस्त शब्दाचा वापर केला. त्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्यावतीने शुक्रवारी वर्धा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन तर आष्टी (श.) येथील बस स्थानकासमोर रावसाहेब दानवे यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला. दोन्ही आंदोलनात मोठ्या संख्येने काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
वर्धा शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केलेल्या वादग्रस्त शब्दाच्या निषेधार्थ जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने सकाळी ११ वाजतापासून धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्त्व जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्रभारी जिल्हाध्यक्ष सुनील कोल्हे यांनी केले. आंदोलनादरम्यान निवासी उपजिल्हाधिकारी मंगेश जोशी यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनातून शेतकऱ्यांना अपमानीत करणाऱ्या खा. दानवे यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करीत गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. आंदोलनात सहभागी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी खा. दानवे यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी या आशयाची तक्रार शहर पोलीसात दाखल केली. भाजपाने निवडणुकीच्या काळात जनतेला नानाप्रकारचे आश्वासने दिली. परंतु, सत्तेत आल्यानंतर भाजपाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनाच आश्वासनांचा विसर पडल्या लगतचे चित्र बघावयास मिळत आहे.
केंद्र व राज्यातील भाजपा सरकार आपली जबाबदारी झटकू पाहत आहे. त्यातच प्रदेशाध्यक्ष पदावर विराजमान असलेले खा. दानवे यांचे विधान निंदनिय असून त्याचा आम्ही निषेध करतो, असेही निवेदनात नमुद करण्यात आले आहे.
या आंदोलनात महिला काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्ष हेमलता मेघे, रामभाऊ सातव, जि. प. सदस्य चंद्रकांत ठक्कर, संजय शिंदे, कृउबाचे उपसभापती पांडुरंग देशमुख, पं.स. सदस्य अमीत गावंडे, राजेश राजूरकर, बाळा माऊस्कर, माजी सभापती बाळा जगताप, माजी जि. प. सदस्य मनोज चांदुरकर, कृउबाचे सदस्य कमलाकर शेंडे, मनीष गंगमवार, माजी सरपंच रवी भुजाडे, वासुदेव ढुमणे, सुधाकर मेहरे, अर्जूनसिंग ठाकूर, हरिदास चाफले, गोविंद काळे, बाबाराव शेर, भीमराव ओंकार, विशाल चौधरी, सतीश ताकसांडे यांच्यासह काँग्रेसचे महिला-पुरुष पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.