तूर, चण्यावर अळीचा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 12:43 AM2018-11-18T00:43:45+5:302018-11-18T00:44:37+5:30
तुरी पीक सध्या मोठ्या प्रमाणात बहरले असुन तुर ही फुलावर व शेंगावर आली आहे. वातावरण बदलामुळे तुरी पिकावर व चन्यावरही अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांनी तुर पिकावर दोन ते तीन फवारे मारले तरीही अळी नियंत्रणात आली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
विरूळ (आकाजी) : तुरी पीक सध्या मोठ्या प्रमाणात बहरले असुन तुर ही फुलावर व शेंगावर आली आहे. वातावरण बदलामुळे तुरी पिकावर व चन्यावरही अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांनी तुर पिकावर दोन ते तीन फवारे मारले तरीही अळी नियंत्रणात आली नाही. त्यामुळे तुर उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. यावर्र्षी सर्वत्र दुष्काळी परिस्थिती असतांना मात्र शेतातील पिकांवर अनेक रोगांनी आक्रमण केल्याने शेतकरी महागडे किटकनाशक औषध फवारणी करून थकले आहे. फवारणीच्या नादात शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे.
यावर्षी शेतकऱ्यांची परिस्थिती फारच चिंताग्रस्त आहे. नगदी समजले जाणाऱ्या सोयाबीन पिकाला उतारीच नसल्याने सोयाबीन फारच कमी प्रमाणात पिकले. अनेक शेतकऱ्यांना एकरी एक ते दोन पोत्याच्या उत्पादनात समाधान मानावे लागले. त्यामुळे सोयाबीन पेरणीचा खर्च, खत व फवारणी, काढणीचाही खर्च निघाला नाही. नंतर कपाशी पिकावर सर्व शेतकऱ्यांची भिस्त असतांना मात्र या भागात जिल्ह्यात प्रथमच निजामपुर येथील भांगे यांच्या शेतात बोंडअळी आढळल्याने शेतकरी पुरता धास्तावलेला होता. सुरवातीलाच बोंडअळी कपाशी पिकावर आढळल्याने नागपूरपासुन तर जिल्हयातील कृषी विभाग बोंड अळीवर मात करण्यासाठी कामी लागला. योग्य मार्गदर्शनामुळे या भागातील बोंडअळीचे प्रमाण कमी करता आले.
नंतर एका महिन्यातच कपाशीवर चुरडा रोगाचे आक्रमण झाले. यातुन कपाशीची परिस्थिती थोडीफार सुधारली असतांना मात्र ऐन कपाशी वेचण्याच्या हंगामातच कपाशीवर लाल्या रोगाचे आक्रमण झाल्याने शेतकरी पुरता हादरला आहे. सुरवातीपासुनच कपाशीवर महागडे विविध प्रकारचे किटकनाशक फवारून शेतकरी पुरता वैतागला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट पुर्णपणे कोसळले आहे. त्यातच कपाशीच्याही पिकात घट येणार असल्याचे संकेत मिळत आहे. शेतकऱ्यांना मार्गदर्शनात आर्वी कृषि विभाग मात्र उदासीन असल्याचे दिसून येत आहे.