१०० वर्षांच्या सागवृक्ष ‘ग्लोरी आॅफ वर्धा’चे संवर्धन
By Admin | Published: May 7, 2016 02:08 AM2016-05-07T02:08:10+5:302016-05-07T02:08:10+5:30
वन विभागाच्या ढगा येथील राखीव वनक्षेत्रात वादळामुळे उन्मळून पडलेल्या आणि १०० वर्षाचे आयुष्य असलेल्या विशाल सागवान वृक्षाचे संवर्धन करून वनसंग्रहालयात ठेवण्यात येणार आहे.
वर्धा वनविभागाचा ‘राम’ आता वन संग्रहालयात : १४.२० मीटर लांबी, ३.२० मीटर गोलाई
वर्धा : वन विभागाच्या ढगा येथील राखीव वनक्षेत्रात वादळामुळे उन्मळून पडलेल्या आणि १०० वर्षाचे आयुष्य असलेल्या विशाल सागवान वृक्षाचे संवर्धन करून वनसंग्रहालयात ठेवण्यात येणार आहे. ग्लोरी आॅफ वर्धा म्हणून ओळख असलेल्या सागवान वृक्षाची लांबी १४.२० मीटर असून छाती उंचीवर ३.२० मीटर गोलाई आहे. सध्या सागवान वृक्ष बांगडापूर येथील वन विभागाच्या परिसरात ठेवण्यात आला आहे.
अत्यंत दुर्मिळ अशा सागवान वृक्ष २१४ क्रमांकाच्या ढगा बीटच्या नाल्याच्या काठावर वादळी पावसात पडले होते. या महाकाय वृक्षाचे संवर्धन करून ते अभ्यासकांसाठी वनसंग्रहालयात ठेवण्यात येणार असल्याची माहिती उपवनसंरक्षक दिगंबर पगार यांनी दिली.
वर्धा वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणात सागवान प्रजातीचे वृक्ष असून वर्धेच्या सागवानासंदर्भात बोलताना उपवनसंरक्षक पगार म्हणाले की, खरांगणा, ढगा हे समृद्ध क्षेत्र आहे. येथील सागवानाच्या लाकडाच्या बुंधा हा पोकळ असतो. वादळात पडलेल्या सागवान वृक्षासह बुंधासुद्धा खोदून काढून मुळासह काढण्यात आले आहे. ढगा येथून बांगडापूर येथील वन डेपोपर्यंत वाहतुकीसाठी २० वन कामगार, २० अधिकारी व कर्मचारी यांच्या तब्बल १२ ते १३ तासाच्या प्रयत्नाने लांब १८ चाकाच्या ट्रक, ट्रॅक्टर व क्रेनच्या सहाय्याने रात्री ११ वाजता बांगडापूर शेडमध्ये ठेवण्यात यश आले. या महाकाय वृक्षाचा बुंधासुद्धा वन निरीक्षण कुटीत ठेवण्यात आला आहे. या सागवानाची किंमत पाच लाखापेक्षा जास्त असून वाहतुकीसाठी ४२ हजार रुपयांचा खर्च आला आहे.(प्रतिनिधी)
जिल्ह्यात पाच जैवविविधता पार्क
वर्धा जिल्ह्यातील समृद्ध वनसंपदेची माहिती व्हावी तसेच वनसंवर्धन व संगोपनासाठी लोकसहभाग वाढावा यासाठी पाच जैवविविधता पार्क तयार करण्यात येणार आहेत. जैवविविधता पार्क सेलूकाटे, ढगा, सारंगपूरी, बोरधरण व पवनार येथे होणार आहेत. प्राईड आॅफ वर्धा हे सागवानाचे वृक्ष जैवविविधता पार्कात ठेवण्यात येणार आहे.
वर्धा वनक्षेत्रात सागवानाचे वृक्ष मोठ्या प्रमाणात असले तरी शंभर वर्ष आयुष्य व लांबी आणि रूंदी असलेले हे महाकाय वृक्ष एकमेव आहे. त्यामुळे याचे वन संग्रहालयात संवर्धन करण्यात येणार आहे. प्राईड आॅफ वर्धाचे ढगा ते बांगडापूर आॅपरेशनसाठी वनक्षेत्र अधिकारी व्ही.व्ही. तळणीकर, एस.बी. तळवतकर, बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी करण्यात आली.