उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्राची प्रसिद्धी करावी
By admin | Published: February 6, 2017 01:08 AM2017-02-06T01:08:56+5:302017-02-06T01:08:56+5:30
उमेदवारांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीबाबत मतदारांना माहिती होणे गरजेचे आहे. यासाठी उमेदवाराने निवडणूक आयोगाला सादर केलेल्या
चंद्रकांत पुलकुंडवार : जिल्हाधिकारी कार्यालयात जि.प. व पं.स निवडणूक आढावा
वर्धा : उमेदवारांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीबाबत मतदारांना माहिती होणे गरजेचे आहे. यासाठी उमेदवाराने निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राची प्रसिद्धी वृत्तपत्रातून जाहिरातीद्वारे व मतदान केंद्राच्या बाहेर फ्लेक्स लावून करावी, अशा सूचना निवडणूक निरीक्षक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी जि.प., पं.स. निवडणुकीचा आढावा घेण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. बैठकीला निवडणूक निरीक्षक भंडाराचे अप्पर जिल्हाधिकारी प्रदीप डांगे, वर्धेचे अप्पर जिल्हाधिकारी संजय दैने, निवासी उपजिल्हाधिकारी मंगेश जोशी, उपजिल्हाधिकारी निवडणूक एन.के. लोणकर उपस्थित होते.
निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता ठेवण्यासाठी ईव्हीएम तपासणी, मॉक पोल यासारख्या प्रक्रिया राबविताना राजकीय पक्ष व उमेदवारांना नोटीस देऊन आमंत्रित करावे. संपूर्ण प्रक्रियेचे चित्रीकरण करावे. प्रचारासाठी सर्व पक्षाच्या उमेदवारांना समान संधी मिळावी यासाठी सभेच्या मैदानाचे नियोजन करावे. निवडणूक काळात कायदा, सुव्यवस्था राखण्यासाठी शांतता समितीची बैठक प्रत्येक तालुक्यामध्ये घेण्यात यावी, अशा सूचनाही पुलकुंडवार यांनी दिल्या.
स्थीर निगरानी पथकाने प्रत्येक नाक्यावर वाहनांची तपासणी करून दारू, पैसा यांची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करावी. निवडणूक खर्च समिती व चित्रीकरण पथकाने समन्वय साधून काम करीत उमेदवारांच्या खर्चाचा योग्य हिशेब ठेवावा, अशा सूचना निवडणूक निरीक्षक डांगे यांनी दिल्या. मतमोजणी कक्ष व स्टाँग रूमसाठी योग्य ठिकाणाची निवड करावी. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राबाहेर बीएलओ यांना मतदार याद्या घेऊन बसण्याची व्यवस्था करावी. मतदारांना मतदान चिठ्ठी घरपोच द्यावी, अशाही सूचना दिल्या.
बैठकीला आठही जि.प. व पं.स. निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, जिल्हा पोलीस उपअधीक्षक रवींद्र किल्लेकर, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जिचकार, सा.बां. विभागाचे कार्यकारी अभियंता शरद चौधरी उपस्थित होते.(कार्यालय प्रतिनिधी)