मानवाच्या विकासासाठी पोषण आहार योग्य अत्यावश्यक
By admin | Published: July 23, 2016 02:42 AM2016-07-23T02:42:35+5:302016-07-23T02:42:35+5:30
सकस पोषण आहाराअभावी मानवाचा विकास शक्य होणार नाही. यासाठी पोषण आहार कोणता घेतला पाहिजे याची माहिती असणे आवश्यक आहे.
अशोक पावडे : पोषण आहारांतर्गत परसबाग प्रशिक्षण कार्यशाळा
वर्धा : सकस पोषण आहाराअभावी मानवाचा विकास शक्य होणार नाही. यासाठी पोषण आहार कोणता घेतला पाहिजे याची माहिती असणे आवश्यक आहे. गावपातळीवर प्रत्येक घरी, शासकीय कार्यालय परिसरात परसबागेमध्ये शास्त्रशुद्ध सेंद्रीय पद्धतीने भाजीपाला व फळझाडांची लागवड करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राजमाता जिजाऊ माता-बाल आरोग्य व पोषण मिशनचे उपसंचालक अशोक पावडे यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या सभागृहात शुक्रवारी राजमाता जिजाऊ माता-बाल आरोग्य व पोषण मिशन अंतर्गत पोषण आहार संदर्भात परसबाग प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी पावडे बोलत होते. यावेळी राजमाता मिशनचे एमआयएस व्यवस्थापक उल्हास खळेगावकर, महिला बाल कल्याण चे उपमुख्यकार्यकारी अधिकारी एस.एम.मेसरे, अश्विनी पाटील उपस्थित होत्या.
पावडे म्हणाले, गावपातळीवर असलेल्या अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक शाळा, ग्रामपंचायत व घरोघरी लोकसहभागातून परसबाग तयार करावी. शास्त्रशुद्ध पद्धतीचा अवलंब आणि सेंद्रीय खताचा वापर करून भाजीपाला, फळझाडे लावावी. यामुळे सध्या बाजारात येणाऱ्या रासायनिक पद्धतीच्या आहाराला आळा बसून गावपातळीवर तयार करण्यात आलेल्या पोषणामुळे गर्भवतींना व बालकाांना सकस आहार मिळून कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यास मदत होईल.
पोषण आहार चळवळीसाठी राज्यातील ६ जिल्ह्याचा समावेश असून वर्धा जिल्हा परिषदेच्या पुढाकाराने येथे सुद्धा प्रायोगिक तत्वावर पोषण चळवळ सुरू करण्यात आली आहे. या कार्यशाळेत प्रशिक्षण घेऊन गावपातळीवर लोकसहभाग घेऊन परसबाग तयार करण्याचे आवाहनही यावेळी त्यांनी केले.
खळेगावकर यांनी सुद्धा पोषण आहार चळवळीविषयी मार्गदर्शन केले. अश्विनी पाटील यांनी परसबाग कमी जागेत, कमी खर्चात आणि सेंद्रीय खत निर्मित कशी करावी यावर उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले. कार्यशाळेला जिल्हा परिषदचे सर्व विभागाचे विस्तार अधिकारी, एकात्मिक बाल विकास अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.(शहर प्रतिनिधी)