धामच्या उंचीचा प्रस्ताव ९४ कोटींवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 01:12 AM2017-09-28T01:12:00+5:302017-09-28T01:12:17+5:30

सिंचन क्षमतेत वाढ करून पिण्यासाठी तथा औद्योगिक वापरासाठी पाणी उपलब्ध व्हावे म्हणून धाम प्रकल्पाची उंची वाढविण्याचा प्रस्ताव होता.

The proposal of Dhama height is 9 4 crores | धामच्या उंचीचा प्रस्ताव ९४ कोटींवर

धामच्या उंचीचा प्रस्ताव ९४ कोटींवर

Next
ठळक मुद्दे१९ वर्षांपासून निविदाही नाही : प्रशासकीय मान्यतेसाठी पुन्हा प्रक्रियेस प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सिंचन क्षमतेत वाढ करून पिण्यासाठी तथा औद्योगिक वापरासाठी पाणी उपलब्ध व्हावे म्हणून धाम प्रकल्पाची उंची वाढविण्याचा प्रस्ताव होता. १९९८ मध्ये प्रथम ४.२६ कोटी रुपयांच्या या कामाला प्रशासकीय मान्यता होती; पण प्रशासकीय उदासिनतेमुळे १९ वर्षांत कुठलेही काम झाले नाही. परिणामी, या कामाची किंमत ९४ कोटींवर पोहोचली आहे.
वर्धा शहरासह ग्रामीण भागाला आर्वी तालुक्यातील महाकाळी येथील धाम प्रकल्पातून पाणी पुरविले जाते. १९८६ मध्ये पूर्ण झालेल्या या प्रकल्पाची सिंचन क्षमता ९०७५ होती; पण पिण्यासाठी तथा औद्योगिक वापरासाठीही आरक्षण आल्याने सिंचन मर्यादा ७ हजार हेक्टर ठेवण्यात आली. सिंचन क्षेत्र विस्तारता यावे म्हणून या प्रकल्पाची उंची वाढविण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला. १९९८ मध्ये या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यताही प्रदान करण्यात आली. यासाठी ४ कोटी २६ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित होता. प्रशासकीय मान्यता प्राप्त होताच कामे सुरू करणे गरजेचे होते; पण तसे झाले नाही. परिणामी, पहिली मान्यतेची मुदत संपली. यामुळे २००६ मध्ये पुन्हा नव्याने प्रस्ताव सादर करण्यात आला. तोपर्यंत कामाची किंमत वाढली होती. यामुळे २२ कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठविण्यात आला. या प्रस्तावालाही प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली. यावरून प्रकल्पाच्या बुडित क्षेत्रात येणाºया वन विभागाच्या ३६ एकर जमिनीसाठी वनप्रस्ताव सादर करण्यात आला. यावर वन विभागाकडून २०१० मध्ये आलेल्या मंजुरीनुसार ९ कोटी रुपये प्रदान करण्यात आले. किमान यानंतर तरी काम सुरू होईल, अशी अपेक्षा होती; पण पुन्हा प्रशासकीय तथा राजकीय उदासिनता आड आली. यामुळे किंमत वाढल्याने वन विभागाकडून पुन्हा ३६ लाख रुपयांची मागणी नोंदविण्यात आली आहे. दोन वेळा प्रशासकीय मान्यता मिळूनही १९ वर्षांत धाम प्रकल्पाच्या भिंतीची उंची वाढली नाही.
मागील वर्षी रूजू झालेल्या कार्यकारी अभियंत्यांनी पुन्हा धाम प्रकल्पाची उंची वाढविण्याच्या प्रस्तावाकडे लक्ष दिले आहे. वर्धा जिल्ह्यातच घुटमळणारा प्रस्ताव नाशिकपर्यंत पोहोचता केला आहे; पण त्या कामाची किंमत मात्र प्रचंड वाढली आहे. आता धाम प्रकल्पाच्या भिंतीची उंची वाढविण्यासाठी ९४ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. हा प्रस्ताव परिपूर्ण व्हावा म्हणून कालवे, उपकालवे, पाटचºया यासाठी सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे. शिवाय जलसंपत्ती नियमन प्राधिकरणच्या मंजुरीची प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे. केवळ त्रूटी काढून प्रस्ताव परत पाठविल्यास पुन्हा एक-दोन वर्षांचा विलंब होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यात वन विभागाला दिलेल्या ९ कोटी रुपयेही व्यर्थ जाणार आहे. शिवाय प्रकल्पाची किंमत वाढून १०५ कोटींच्या घराज जाण्याची शक्यता आहे. यामुळे धाम प्रकल्पाची उंची वाढविण्याच्या प्रस्तावाला मान्यता मिळून त्वरित काम सुरू होणे गरजेचे झाले आहे.
सिंचन क्षेत्रात होणार वाढ
सिंचन क्षेत्रात वाढ करण्याकरिता धाम प्रकल्पाची उंची वाढविणे अत्यंत गरजेचे झाले आहे. यासाठी वर्धा पाटबंधारे विभागाकडून प्रस्ताव पाठविले जात आहेत; पण अधिकारी बदलला की त्यावर कुठलीही कारवाई होत नाही. नव्याने आलेले अधिकारी पुन्हा प्रस्ताव सादर करतात; पण पूढे काहीच होत नाही, ही स्थिती आहे. धाम प्रकल्पाची उंची वाढविल्यास सिंचन क्षेत्रात २ हजार हेक्टरने वाढ होणार आहे. शिवाय नवीन क्षेत्रातील नैसर्गिक जलसाठ्यांमध्येही वाढ होणार आहे.
पिण्यासाठी तथा उद्योगांना मिळणार पाणी
धाम प्रकल्पाची उंची वाढविल्यास केवळ सिंचन क्षमताच वाढणार नाही तर पिण्याच्या तथा उद्योगांसाठीच्या जलसाठ्यातही वाढ होणार आहे. सध्या धाम प्रकल्पातून वर्धा शहरासह ग्रामीण भागाला पाणी पुरवठा केला जातो. शिवाय उद्योगांनाही पाणी दिले जाते. प्रकल्पाची उंची वाढल्यास ही क्षमता आणखी वाढणार आहे.

१९९८ मध्ये उंची वाढविण्याच्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता मिळाली होती; पण काम सुरू झाले नाही. यामुळे प्रस्ताव मुदतबाह्य झाला. २००६ मध्ये पुन्हा प्रस्ताव पाठवून मंजुरी मिळविली; पण काम न झाल्याने आता पुन्हा प्रस्ताव पाठविला. किंमत ९४ कोटींवर पोहोचली. प्रस्ताव नामंजूर होऊ नये म्हणून कालवे, उपकालव्यांचे सर्वेक्षण केले जात आहे. प्रकल्पासाठी पाणी उपलब्धता प्रमाणपत्र प्रस्तावही तयार करण्याचे काम सुरू आहे.
- श्याम काळे, कार्यकारी अभियंता, वर्धा पाटबंधारे विभाग, वर्धा.

Web Title: The proposal of Dhama height is 9 4 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.