दुप्पट रेती उपस्यामुळे घाट ‘कॅन्सलेशन’चा प्रस्ताव
By admin | Published: March 30, 2015 01:48 AM2015-03-30T01:48:23+5:302015-03-30T01:48:23+5:30
रेती चोरीवर आळा घालण्याकरिता विविध उपाययोजना केल्या जातात; पण ती थांबत नसल्याचे दिसते़ देवळी तालुक्यातील आपटी या घाटावरही रेतीची चोरी होत आहे़ ...
वर्धा : रेती चोरीवर आळा घालण्याकरिता विविध उपाययोजना केल्या जातात; पण ती थांबत नसल्याचे दिसते़ देवळी तालुक्यातील आपटी या घाटावरही रेतीची चोरी होत आहे़ २२५ ब्रास रेती उपस्याची परवानगी असताना घाट धारकाने दोन महिन्यांतच तब्बल ५५० ब्रास रेतीचा उपसा केला़ ही बाब उपविभागीय अधिकाऱ्यांनी रविवारी घातलेल्या धाडीत समोर आल्याने घाट रद्द करण्याचा अहवाल सादर केला जाणार आहे़
देवळी तालुक्यातील वर्धा नदीवरील आपटी या घाटाचा लिलाव झाला होता़ सदर घाट अतूल प्रतापराव मोहिते रा़ उमरस, ता़ कराड, जि़ सातारा यांनी घेतला़ या घाटातून एकूण २२५ ब्रास रेतीच्या उपस्याची परवानगी होती़ शिवाय पात्रामध्ये पाण्यावर दोन फुट थर असलेल्या रेतीचाच उपसा करण्याची परवानगी देण्यात आलेली होती़ असे असताना या घाटातून बोट व सक्शन पंपच्या साह्याने रेतीचा उपसा सुरू होता़ या घाटातून दोन महिन्यांतच तब्बल ५५० ब्रास रेती उपसण्यात आली़ रेतीचोरी थांबविण्यासाठी म्हणून सुरू करण्यात आलेल्या शासनाच्या ‘स्मॅट’ या एसएमएस सिस्टीमवर मात्र केवळ १८ ब्रास रेतीचा उपसा झाल्याची नोंद आहे़ याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे़ उपविभागीय अधिकाऱ्यांच्या धाडीत घाटावर तीन बोटी, सक्शन पंप, एक पोकलॅण्ड, तीन ट्रक आणि चार ट्रॅक्टर दिसून आले़ घाटाचा पंचनामा करण्यात आला असून दुसरी कारवाई असल्याने सदर घाट रद्द करण्यात यावा, असा अहवाल सादर करण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी दिली़ या कारवाईत देवळीचे तहसीलदार जितेंद्र कुवर, कोतवाल सुनील इवनाथे, एसडीओ कार्यालयाचे विलास बढे यांच्यासह कर्मचारी सहभागी झाले़ (कार्यालय प्रतिनिधी)