पांदण रस्त्यांचा प्रस्ताव रखडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 11:47 PM2019-06-12T23:47:20+5:302019-06-12T23:47:58+5:30
पांदण रस्त्यांना ग्रामीण मार्गाचा दर्जा देऊन रस्ते विकास आराखड्यात त्याचा समावेश करण्याबाबत शासनाची मंजुरी घेण्याचा प्रस्ताव सभागृहात मांडण्यात आला पण; काही सदस्यांनी त्यांच्या सर्कलमधील पांदण रस्त्यांचा समावेश नसल्याचा आक्षेप नोंदविण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : पांदण रस्त्यांना ग्रामीण मार्गाचा दर्जा देऊन रस्ते विकास आराखड्यात त्याचा समावेश करण्याबाबत शासनाची मंजुरी घेण्याचा प्रस्ताव सभागृहात मांडण्यात आला पण; काही सदस्यांनी त्यांच्या सर्कलमधील पांदण रस्त्यांचा समावेश नसल्याचा आक्षेप नोंदविण्यात आला. त्यामुळे हा प्रस्ताव रखडला असून मंजुरीकरिता पुढील सभेपर्यंत प्रतीक्षाच करावी लागणार आहे.
जिल्हा परिषदेच्या सभागृहात आज विशेष सभा पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा कांचन नांदूरकर होत्या. तसेच मुख्य कार्यपालन अधिकारी सचिन ओम्बासे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विपुल जाधव, वित्त व लेखाधिकारी शेळके, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती मुकेश भिसे, महिला व बालकल्याण समिती सभापती सोनाली कलोडे, समाज कल्याण समिती सभापती नीता गजाम यांची उपस्थिती होती. या सभेत पांदण रस्ते वर्गीकृत करुन रस्ते विकास आराखडा २००१ ते २०२१ मध्ये समाविष्ट करण्यासंदर्भात प्रस्ताव ठेवण्यात आला. यामध्ये ६५ पांदण रस्त्याचा समावेश असून शासनाची मजुरी घेण्याकरिता हा प्रस्ताव सभागृहात ठेवण्यात आला. परंतु काही सदस्यांनी त्यांच्या सर्कलमधील पांदण रस्त्यांचा समावेश नसल्याने आक्षेप नोंदविले. तसेच यावेळी सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे समाधानकारक उत्तर न मिळाल्याने हा प्रस्ताव पुढील सभेत ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या. त्यामुळे हा प्रस्ताव सध्या तरी लांबणीवर पडला आहे. या सभेत अन्य तीन विषयांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यामध्ये बरबडी येथील सेवाग्राम विकास योजनेतील मौजा बरबडी येथील १.५८ हेक्टर जमीन कृषी उत्पन्न बाजार समितीकरीता आरक्षित ठेवण्यात आली होती.
ही जमिन या आरक्षणातून वगळण्याचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यास जिल्हा परिषदेच्या सभेत मंजुरी दिली. तसेच आजंती ग्रामपंचायतीला सभामंडप बांधकामास जिल्हा ग्राम विकास निधीतून कर्ज देण्यास मंजुरी देण्यासोबतच निरुपयोगी वाहनांचा लिलाव करण्याच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली.
तासभरातच गुंडाळली सभा
विशेष सभेत केवळ चारच विषय ठेवण्यात आले होते. यापैकी तीन विषयांना मंजुरी मिळाली असून पांदण रस्त्यांचा विषय सभागृहात चांगलाच गाजला. त्यामुळे तो विषय नामंजूर करीत सभा तासभरात गुंडाळली.